coronavirus: ई-पासची अट रद्द होताच महामार्गावर वाहनांची गर्दी, वाशी टोल नाक्यावर वाहतूककोंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 12:58 AM2020-09-03T00:58:57+5:302020-09-03T00:59:29+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने मार्चपासून आंतरजिल्हा प्रवासावरही मर्यादा घातल्या होत्या. ई-पासशिवाय मुंबईच्या चाकरमान्यांना गावी जाता येत नव्हते व गावी गेलेल्या नागरिकांना पुन्हा मुंबईला येता येत नव्हते.
नवी मुंबई : शासनाने अंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पासची अट रद्द करताच महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे. वाशी टोल नाक्यावर सकाळी वाहतूककोंडी झाली होती. दोन अपघातांमुळे तेथील चक्काजाममध्ये भर पडली होती.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शासनाने मार्चपासून आंतरजिल्हा प्रवासावरही मर्यादा घातल्या होत्या. ई-पासशिवाय मुंबईच्या चाकरमान्यांना गावी जाता येत नव्हते व गावी गेलेल्या नागरिकांना पुन्हा मुंबईला येता येत नव्हते. शासनाने अनलॉक जाहीर केल्यानंतरही हजारो नागरिक गावीच थांबले होते.
गणेशोत्सव करूनच मुंबईला जाण्याचा निर्णय अनेकांनी घेतला. शासनाने ई-पासची अट रद्द करताच, मंगळवारी रात्रीच चाकरमानी मुंबईकडे रवाना झाले. यामुळे मुंबई-पुणे व मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. सकाळी वाशी टोल नाक्यावर वाहनांची गर्दी झाली होती. टोल नाक्यापासून वाशी प्लाझापर्यंत रांगा आल्या होत्या.
अपघातामुळे चक्काजाम
सकाळी खाली पुलावर दोन अपघात झाले. पुलाच्या सुरुवातीला चार वाहने एकमेकांवर आदळली. दुसऱ्या अपघातामध्ये दोन कारची धडक झाली. अपघातांमुळे वाहतूककोंडीमध्ये भर पडली. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यावर दुपारी १२ नंबर वाहतूक सुरळीत झाली.