CoronaVirus: नवी मुंबईत सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन; रस्त्यावर अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2020 01:25 AM2020-04-24T01:25:47+5:302020-04-24T01:25:55+5:30
अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली सवलतीचा दुरुपयोग
- नामदेव मोरे
नवी मुंबई : जीवनावश्यक वस्तूंच्या नावाखाली अनधिकृत फेरीवाल्यांनी रस्ते, पदपथ व मोकळ्या जागा व्यापण्यास सुरुवात केली आहे. सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन केले जात असल्याने कोरोनाचा धोका वाढला आहे. किराणा दुकानदार व अधिकृत भाजी विक्रेत्यांकडूनही सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र नवी मुंबईमध्ये ठिकठिकाणी दिसू लागले आहे.
नेरूळ सेक्टर १६, १८ कडे जाणाऱ्या रस्त्यावर मागील काही दिवसांपासून २० ते २५ फेरीवाल्यांनी रस्त्यावर भाजी व फळ विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. या ठिकाणी सकाळी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. नेरूळ सेक्टर १० परिसरामध्येही फेरीवाल्यांची संख्या वाढली असून काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या अतिक्रमणाविषयी समाज माध्यमातून आवाज उठविला आहे. महानगरपालिकेकडेही तक्रार केली आहे. नेरूळप्रमाणे परिस्थिती सीवूड परिसरामध्येही सुरू आहे. सेक्टर ४२ मधील मोअर स्टोअर्सच्या जवळील रस्त्यावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. नागरिकांना भाजीपाला उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली रस्त्यावर दुकाने सुरू केली आहेत. तेथेही खरेदीसाठी गर्दी होत असून सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसविले जात आहेत. शहरात इतर ठिकाणीही अशीच स्थिती असून याकडे महानगरपालिका प्रशासनही दुर्लक्ष करत आहे. अनधिकृतपणे रस्त्यावर अतिक्रमण करून शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळणाºया दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे.
शहरातील अधिकृतपणे व्यवसाय करणाºया दुकानदारांकडूनही नियमांचे उल्लंघन केले जात आहे. सद्य:स्थितीमध्ये मेडिकल, दूध विक्रीची दुकाने, किराणा स्टोअर्स व भाजीपाला, फळ विक्री करणाऱ्यांना व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे. या दुकानदारांनी सोशल डिस्टन्सिंग व सुरक्षेच्या इतर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु अनेक दुकानदार मास्कचा वापर करत नाहीत. दुकानदारांनी वारंवार सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे. पण अनेक दुकानांमध्ये सॅनिटायझर ठेवलेले नाही. दुकान मालक व कामगार सॅनिटायझरचा वापरच करत नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. अस्वच्छतेमुळे व सोशल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे पालन न केल्याने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
दूध डेअरीत नियमांचे उल्लंघन
शहरातील प्रत्येक नोडमध्ये डेअरीची छोटी दुकाने आहेत. छोट्या टँकरमधून या डेअरींना दूधपुरवठा केला जातो. दूध घेऊन येणारे कर्मचारी मास्क वापरत नाहीत. हात सॅनिटायझरने धुतले जात नाहीत. डेअरीमध्ये काम करणारे कर्मचारी व दुकानदार सुरक्षेसाठीची काळजी घेत नाहीत.
पालिकेच्या सूचनांना हरताळ
नवी मुंबई महानगरपालिकेने भाजी मार्केटमधील गर्दी कमी करण्यासाठी मार्केट मैदानांमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अनधिकृत फेरीवाल्यांनी या आदेशाचे उल्लंघन करून रस्ते व पदपथावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. या अतिक्रमण करणाºयांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
दक्षता पथकाची पाहणीसाठी गरज
मेडिकल, भाजी, फळ विक्रेते, किराणा दुकान, चिकन, मटन विक्रेते, दूध डेअरी व्यवसायांना परवानगी दिली आहे. या अत्यावश्यक सेवा देणाºया दुकानदारांकडून नियमांचे पालन होत आहे का, याची पाहणी करण्यासाठी दक्षता पथक तयार करण्याची गरज आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन न करणाºयांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.