Coronavirus: एक विषाणू सर्व मानवजातीला भारी पडला; कोरोनामुळे जीवनाकडे बघण्याची नवीन दृष्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 01:01 AM2021-03-22T01:01:28+5:302021-03-22T01:01:41+5:30
मला एक शिकायला मिळाले की आदिमानवापासून ते आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. लाखो वर्षांपासून माणूस जगण्यासाठी संघर्ष करीत असताना कोरोनासारखी किती जीवघेणी संकटे तो झेलीत आला असेल.
कोरोना माहामारी आली आणि सर्वांचीच परीक्षा सुरू झाली. भौतिक सुखाला इतके चटावलेलो आम्ही अचानक सर्वसंग परित्याग करावा लागला. नाही नोकरी-धंदा की प्रवास घरातच कोंडून राहावे लागले. रस्त्यावर गाड्या नाहीत की माणसे सर्व कसे सुनेसुने. इतकी वर्षे गोंगाटात हरवलेल्या पक्ष्यांचा, प्राण्यांचा आवाज लॉकडाऊनमुळे ऐकू आला. लोक निसर्गाकडे वळले. अनेक जणांना कोरोनाने शिकविले.
काही जण शिकले, तर काही विसरूनही गेले. आपापल्या स्वभावाप्रमाणे लोकांनी कोरोनाचा धडा घेतला.
एक विषाणू सर्व मानवजातीला भारी पडला. मृत्यूचे थैमान त्याने घातले. असा एकही माणूस नाही की त्याने आप्तमित्र गमावला नाही. कोरोनाच्या तावडीत कित्येक जण सापडले. मला एक शिकायला मिळाले की आदिमानवापासून ते आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. लाखो वर्षांपासून माणूस जगण्यासाठी संघर्ष करीत असताना कोरोनासारखी किती जीवघेणी संकटे तो झेलीत आला असेल. आज आपण प्रगत जगात वावरत आहोत. ही देणगी खडतर वाटेवरून चाललेल्या आपल्या पूर्वजांची आहे. अनंत काळापूर्वी आलेली कोरोनासारखी आपत्ती झेलीत जगण्याची वाट त्यांनी सोपी केली आहे. डार्विनचा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा सिद्धांत सांगतो की तेच जीवनप्रवाहात तग धरतात ज्यांच्या शरीरात प्रतिकारशक्ती विकसित झालेली असते किंवा तशी ते विकसित करतात.
कोरोनाने अवैज्ञानिक विचार करणाऱ्यांचे पितळ उघडे पाडले. देवाधर्मावर अतिश्रद्धा ठेवणारे भाबडे लोक असतील की अभिमानी लोक त्यांना, आणि नास्तिकतेचा डंका मिरविणारे बुद्धिवादी त्यांना कोरोनाने अंतर्मुख व्हायला लावले. श्रद्धा-अंधश्रद्धांचा खेळ मला कोरोनाने दाखविला. कोरोनासारख्या हल्ल्यांमुळे मानवी जीवन क्षणभंगूर असले तरी निराशावादी न राहता आपल्यापरीने परोपकार करीत समाधानाने जगण्याची प्रेरणा मला कोरोना पर्वाने दिली.
-डॉ. सचिन पाटील
कोरोनाने नियमित हात धुवायला शिकविले
कोरोनाने नियमित हात धुवायला शिकविले. बाहेरची पादत्राणे शक्यतो बाहेरच ठेवणे, बाहेरून आल्यावर सर्वप्रथम हात-पाय स्वच्छ धुणे, बाहेरचे कपडे धुवायला टाकणे आदींसारख्या बाबी कटाक्षाने मी व कुटुंबीय पाळत आहोत. सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे, शिंकताना, खोकलताना रुमाल वापरणे यासारखे स्वच्छतेचे संस्कारदेखील शिकविले. मृत्यूच्या भीतीपोटी का होईना, पण कोरोनाने आपल्यालाही काही सकारात्मक गोष्टी शिकविल्या आहेत. -हर्षदा तांबोळी (कामोठे )
सोशल डिस्टन्सचे महत्त्व लक्षात आले
सामाजिक कार्यक्रम असो किंवा घरघुती कार्यक्रम आदी ठिकाणी आपल्या जबाबदारीची नवीन जाणीव निर्माण झाली. घरात येताना-जाताना हात-पाय स्वच्छ धुण्याची महत्त्वाची सवय लागली. -गुरुनाथ म्हात्रे (खारघर)
कोरोनाने मला सहनशीलता शिकविली
आतापर्यंत घरामध्ये थांबत नव्हतो, आता थांबायला लागले. आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला शिकविले. विशेष म्हणजे स्वच्छतेचे महत्त्व कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात माझ्या लक्षात आले आहे. नियमित हात धुणे, मास्कचा वापर, उघड्यावर न थुंकणे आदी महत्त्वाच्या गोष्टी मी प्रामाणिकपणे पाळत आहे. -योगेश सोनवणे(नेरूळ )
काेराेनामुळे माणुसकी जागी झाली
काेराेनासारखा राेग आला आणि माणसातला ‘माणूस’ जागा झाला. शासनाचे नियम काटेकाेर पाळण्याची माेडलेली सवय काेराेनामुळे अंगीकारावी लागली. सार्वजिनक वाहतूक बंदीमुळे जे घरामध्ये उपलब्ध हाेते त्याच्यातच धन्यता मानावी लागली, कित्येकांनी राेशनिंगच्या तांदूळवर दिवस काढले. नात्यामध्ये दुरावा काेरानामुळे संपुष्टात आला. काहीही झाले तरी स्वत: आणि आपले नातेवाईक जगले पाहिजेच या दृष्टिकाेनातून प्रत्येकजण नातेवाइकांसाठी औषधे पाेहचवू लागला.काेराेनामुळे वेळेबराेबरच पैशांची बचत तसेच अराेग्य सुदृढ तर माणूस सक्षम ही शिकवण दिली. - ॲड. राकेश ना. पाटील
घरातून निघताना आठवणीने मास्क घालायला लागलो
बॅगमध्ये छोटीशी सॅनिटायझरची बॉटल कायमस्वरूपी मी ठेवत आहे. सोशल डिस्टन्सिंगचे महत्त्व पटायला लागले. घरातली मुलेही बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवायला लागली. स्वच्छतेची नवीन क्रांती आमच्या जीवनात निर्माण झाली. -वैशाली ठाकूर (खारघर )