Coronavirus: कोरोनाने काय शिकवले?; मुक्या प्राण्यांना दिलं अन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 12:10 AM2021-03-22T00:10:49+5:302021-03-22T00:11:08+5:30
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी गेल्या वर्षी २२ मार्चपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. लॉकडाऊनपासून प्रत्येक जण घरात अडकला. या काळात कोरोनाने काय शिकवले? कोणता धडा दिला? त्याविषयी हे अनुभव.
पैसा, संपत्ती यापेक्षा माणुसकी श्रेष्ठ आहे, हेच सत्य कोरोनामुळे अधोरेखित झाले. कोरोना अजूनही गेलेला नाही. परंतु मागील वर्षभरात जीवनाचे खरे मूल्य कोरोनाने शिकविले. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात ताळेबंदी घोषित करण्यात आली. याचा फटका सर्वच क्षेत्राला बसला. विशेषता हातावर पोट असलेल्या कष्टकरी वर्गाला याची सर्वाधिक झळ बसली. मुक्या प्राण्यांची ससेहोलपट सुरू झाली. बेवारस निराधारांवर उपासमारी ओढावली. सुरुवातीच्या काही दिवसांतच याचे गांभीर्य माझ्या निदर्शनास आले.
त्यानुसार मी माझ्या मित्राच्या मदतीने योजना तयार केली. संकट मोठे होते. २१ मार्च रोजी दोन अन्य सहकाऱ्यांना सोबत घेऊन पदपथावर उपासमारीचे जीवन जगणाऱ्यांना खाऊ आणि पाणी वाटप केले. त्यानंतर २३ मार्च रोजी देशात ताळेबंदी घोषित करण्यात आली. त्यानुसार दरदिवशी पाचशे लोकांना रात्रीचे जेवण देण्याचे ठरले. ही बाब माझ्या आर्थिक कुवतीच्या बाहेरची होती. ताळेबंदीमुळे माझी फिटनेस अॅकेडमी ठप्प पडली होती. उत्पन्नाचे स्त्रोत बंद पडले होते. अशा परिस्थितीत हा खर्च उचलायचा कसा, असा प्रश्न भेडसावत होता. मात्र न डगमगता जमेल तेवढे करण्याचा इरादा पक्का केला. आर्थिक मर्यादा झुगारून स्वत:ची पदरमोड करून हे काम अविरत सुरू ठेवले. गोरगरिबांना सर्वच घटकांतून मदतीचा ओघ सुरू झाला. या काळात आम्ही तब्बल २० हजार गरिबांना अन्नदान केले. ही प्रक्रिया सुरू असतानाच मुक्या प्राण्यांचे काय, असा सवाल माझ्या मनाला शिवून केला. दुसऱ्या दिवसांपासून शहरात भटक्या कुत्र्यांना अन्न व पाणी देण्याची मोहीम सुरू केली. ती आजही सुरू आहे.
- अभय धोंडीराम वाघमारे फिटनेस तज्ज्ञ, नवी मुंबई
(संकलन- कमलाकर कांबळे)