coronavirus: नवी मुंबईत रुग्णांना लुबाडणे थांबणार कधी? रुग्णालयांकडून ३० हजार ते १ लाख अनामत रकमेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 12:48 AM2020-09-04T00:48:19+5:302020-09-04T06:59:41+5:30

कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाऱ्या रुग्णांचीही प्रचंड गैरसोय होत असून, उपचाराविना अनेकांना जीव गमवावा लागत आहे. रुग्णांची ही लुबाडणूक कोण व कधी थांबविणार, असा प्रश्न नवी मुंबईकर विचारू लागले आहेत.

coronavirus: When will stop robbery on patient money in Navi Mumbai? 30,000 to 1 lakh deposit demand from hospitals | coronavirus: नवी मुंबईत रुग्णांना लुबाडणे थांबणार कधी? रुग्णालयांकडून ३० हजार ते १ लाख अनामत रकमेची मागणी

coronavirus: नवी मुंबईत रुग्णांना लुबाडणे थांबणार कधी? रुग्णालयांकडून ३० हजार ते १ लाख अनामत रकमेची मागणी

Next

- नामदेव मोरे
नवी मुंबई : रुग्णालय चालकांकडून महानगरपालिका व शासनाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी ३० हजार ते १ लाख रुपये अनामत रक्कम मागितली जात आहे. भरमसाट बिलांची आकारणी करून रुग्णांना लुबाडले जात आहे. कोरोनाव्यतिरिक्त आजार असणाऱ्या रुग्णांचीही प्रचंड गैरसोय होत असून, उपचाराविना अनेकांना जीव गमवावा लागत आहे. रुग्णांची ही लुबाडणूक कोण व कधी थांबविणार, असा प्रश्न नवी मुंबईकर विचारू लागले आहेत.

तुर्भे इंदिरानगर झोपडपट्टीमधील १३ वर्षांच्या मुलाला ६ आॅगस्टला मनपा रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे अँटिजेन चाचणी निगेटिव्ह आली. परंतु रुग्णाची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्याला दुसºया रुग्णालयात घेऊन जाण्याचा  सल्ला देण्यात आला. मनपाची जनरल रुग्णालये बंद असल्यामुळे व खासगी रुग्णालयांची फी परवडत नसल्याने पालकांनी मुलाला घरी नेले. परंतु प्रकृती आणखी खालावल्यामुळे पुन्हा रुग्णालयात दाखल केले; पण, उपचारास विलंब झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

रुग्णालयीन अनास्थेचा हा पहिला बळी नाही. यापूर्वीही वेळेत उपचार न झाल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. नवी मुंबईमध्ये खासगी व मनपा रुग्णालयांचे जाळे असूनही सर्वसामान्य नागरिकांना उपचारासाठी धडपडावे लागत आहे. नवी मुंबईमधील आरोग्यविषयी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने अनेक प्रमुख रुग्णालयांशी संपर्क साधला असता धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. येथील प्रमुख रुग्णालयांमध्ये ५० हजार ते १ लाख रुपये तर, काही रुग्णालयांमध्ये २५ ते ३० हजार रुपये अनामत रक्कम मागितली जात आहे.

महानगरपालिकेने कोरोना व इतर आजार असणाºया रुग्णांवर उपचार करण्यासाठी आचारसंहिता घालून दिली आहे. परंतु यामधील बहुतांश नियम धाब्यावर बसविण्यात येत आहेत. पीपीई किट्सचा खर्च सर्व रुग्णांकडून स्वतंत्र घेतला जाऊ नये अशा सूचना असतानाही सर्रास सर्व रुग्णांच्या बिलामध्ये प्रतिदिन पीपीई किट्सचा उल्लेख केला जात आहे. महानगरपालिकेचे सर्वसामान्य रुग्णालय बंद आहे व खासगी रुग्णालयातील दर परवडत नाहीत. अशा स्थितीमध्ये रुग्णांनी जायचे कुठे, असा प्रश्न शहरवासी विचारू लागले आहेत. मनपा कारवाईचा दिखावा करीत आहे. परंतु प्रत्यक्षात ठोस कारवाई करीत नसल्याचा गैरफायदा काही रुग्णालय व्यवस्थापन घेत असल्याचा आरोपही केला जात आहे. मनपाने स्वत:चे जनरल रुग्णालय लवकर सुरू करावे. जादा बिल आकारणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनीही केली आहे.

शहरातील विविध रुग्णालयांत आलेला अनुभव
एमजीएम : वाशीतील एमजीएम रुग्णालयात १ सप्टेंबरला रात्री ११ वाजून २८ मिनिटांनी संपर्क साधला. नेरूळमधील रुग्णाच्या पोटामध्ये वेदना होत असून रुग्णालयात दाखल करायचे असल्याचे सांगितले. रुग्णालयातील कर्मचाºयांनी रुग्णास घेऊन येण्यास सांगितले. १ लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागेल, असेही सांगितले.

अपोलो रुग्णालय, बेलापूर : उरण फाटा रोडवरील अपोलो रुग्णालयात १ सप्टेंबरला रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी रुग्णास उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठीची प्रक्रिया विचारली. तेव्हा, आयसीयू युनिटसाठी १ लाख व सर्वसामान्य विभागात दाखल होण्यासाठी ५० हजार अनामत रक्कम भरावी लागेल, असे सांगण्यात आले.

एमपीसीटी : सानपाडातील एमपीसीटी रुग्णालयात यापूर्वी रुग्णाला जादा बिल आकारल्याने सेना पदाधिकाºयांनी आंदोलन केले. ३ सप्टेंबरला पालिकेच्या संकेतस्थळावर रुग्णालयात एक आयसीयू युनिट शिल्लक असल्याचे दाखविले. रुग्णालयात जाऊन व फोनवरून संपर्क साधला असता बेड शिल्लक नसल्याचे सांगण्यात आले.

तेरणा रुग्णालय, नेरूळ : तेरणा रुग्णालयात २८आॅगस्टला रात्री पनवेलमधून शिंदे नावाचे गृहस्थ उपचारासाठी आले. रात्री एकच्या सुमारास डॉक्टरांनी तपासले. जनरल वार्डमध्ये अ‍ॅडमिट करायचे असल्यास एक दिवसाचे १२ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगण्यात आले. अखेर रुग्णाने घरी जाणे पसंत केले.

निर्मल हॉस्पिटल : कोपरखैरणे मधील निर्मल हॉस्पिटलमध्ये १ सप्टेंबरला रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संपर्क साधला असता बेड उपलब्ध होईल, असे सांगितले. या ठिकाणी सर्वांत कमी ३० हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागेल, असे सांगण्यात आले. रक्कम कमी असली तरी अनामत रक्कम घेऊच नये, अशा सूचना मनपाने दिल्या असल्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले.

डी. वाय. पाटील : नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात १ सप्टेंबरला रात्री ११ वाजून ४९ मिनिटांनी संपर्क साधला. परंतु बहुतांश नंबर्सवर संपर्क होत नव्हता. १२ वाजून १५ मिनिटाला फोनवरून रुग्णालयात घेऊन येण्यास सांगितले. २ सप्टेंबरला रात्री दोन वाजता सीवूडमधील महिलेच्या छातीत दुखत असल्यामुळे पुन्हा रुग्णालयाशी संपर्क साधला. संपर्क होत नव्हता. अखेर रुग्ण घेऊन गेल्यानंतर येथे फक्त कोरोना रुग्णांवर उपचार होतात असे सांगून परत पाठविले.

न्यूरोजन : सीवूडमधील न्यूरोजन रुग्णालयाने रुग्णालयातील दर्शनी भागात बिल किती आकारायचे याविषयी सूचना फलक लावला आहे. परंतु या ठिकाणीही जवळपास ५० हजार ते १ लाख रुपये अनामत रक्कम घेतली जात आहे. याशिवाय प्रतिदिन प्रत्येक रुग्णासाठी पीपीई किटचे पैसेही आकारले जात असल्याचे निदर्शनास आले.

जनरल हॉस्पिटल हवेच
नवी मुंबई महानगरपालिकेचे वाशीमधील प्रथम संदर्भ रुग्णालयाचे डेडिकेटेड कोविड रुग्णालयात रूपांतर केले आहे. यामुळे सर्वसाधारण रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. खासगी रुग्णालयांमध्ये लूट सुरू आहे. खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपाने स्वत:चे जनरल हॉस्पिटल लवकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

रुग्णवाहिका चालकांची लूट
तेरणा रुग्णालयात उपचार घेणाºया रुग्णाचे ३ सप्टेंबरला निधन झाले. रुग्णाची पत्नीही मनपा रुग्णालयात आहे. एक नातेवाईक केरळवरून आले. खासगी रुग्णवाहिका चालकाने तेरणा ते तुर्भे स्मशानभूमीपर्यंत साडेसहा हजार रुपये बिल आकारले. तुर्भे स्मशानभूमी चालकांनी हद्दवाढीचे कारण सांगून मृतदेह शिरवणेला घेऊन जाण्यास सांगितले.ही वागणूक पाहून रुग्णाच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त केली.

महानगरपालिकेचे खासगी रुग्णालय चालकांसाठीचे आदेश पुढीलप्रमाणे
रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी अनामत रकमेची मागणी करू नये.
पीपीई किट्सचा खर्च प्रत्येक रुग्णाकडून न घेता वॉर्डमधील एकूण रुग्णसंख्येत विभागला जावा.
पीपीई किट्स, मेडिकल इम्प्लान्ट, गाईडर, वायर कॅथेटर व इतर
वस्तूंचे दर जास्त
असू नयेत.
रुग्णांसाठी सर्वसाधारणपणे जेनेरिक औषधांचा जास्तीतजास्त वापर करण्यात यावा.
रुग्णाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यास निवासस्थानापर्यंत जाण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात यावी.
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने’चा रुग्णांना लाभ
मिळवून द्यावा.
एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास देयक भरले नाही म्हणून मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यास टाळाटाळ
करू नये.

रुग्णालयांकडून आकारण्यात येणाºया बिलांवर लक्ष ठेवण्यासाठी महानगरपालिकेने समिती स्थापन केली आहे. या समितीपर्यंत तक्रारी पोहोचविता याव्यात यासाठी लवकरच हेल्पलाइन नंबर देण्यात येणार आहे. मनपाच्या वाशी रुग्णालयातील काही भागात जनरल रुग्णालय सुरू करण्यात येणार असून नेरूळ व ऐरोलीमध्येही जनरल रुग्णांसाठी सुविधा वाढविण्यात येतील.
- अभिजित बांगर,
आयुक्त, महानगरपालिका

Web Title: coronavirus: When will stop robbery on patient money in Navi Mumbai? 30,000 to 1 lakh deposit demand from hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.