CoronaVirus :...अन् आठ दिवसांनी झालं नवजात लेकीचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 09:22 PM2020-04-20T21:22:20+5:302020-04-20T21:25:07+5:30
coronavirus: कोरोना पॉजिटिव्ह असल्याने बाळाला तिच्यापासून लांब ठेवल्यांनतर आठ दिवसांनी घेतलेल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यांनतर माय-लेकीची भेट झाली.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोरोना पॉजिटिव्ह आल्याने उपचारासाठी दाखल केलेल्या महिलेला मंगळवारी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सदर महिलेचा प्रसूतीकाळ जवळ आलेला असतानाच तिला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, तिला कोरोनावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता दुसऱ्याच दिवशी तिने मुलीला जन्म दिला. परंतु आई कोरोना पॉजिटिव्ह असल्याने बाळाला तिच्यापासून लांब ठेवल्यांनतर आठ दिवसांनी घेतलेल्या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यांनतर माय-लेकीची भेट झाली.
घणसोली घरोंदा येथे राहणाऱ्या कोरोना पॉजिटिव्ह महिलेला 5 एप्रिलला कोरोनावर उपचारासाठी वाशीतील पालिका रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी ती नऊ महिन्याची गरोदर असल्याने तिचा प्रसूतीकाळजवळ आलेला होता. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. राकेश म्हात्रे यांच्या पथकाने प्रसूतीची सर्व तयारी केली होती. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी या महिलेची प्रसूती झाली असता मुलीला जन्म दिला.
कोरोना बाधित महिलेच्या प्रसूतीची राज्यातील ही दुसरी घटना असल्याने पालिकेकडून पुरेपूर खबरदारी घेण्यात आली होती. तर नवजात मुलीची देखील चाचणी केली असता तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. परंतु महिला कोरोना पॉजिटिव्ह असल्याने नवजात मुलीला आईपासून दूर ठेवण्यात आले होते. यादरम्यान महिलेचे पती देखील होम क्वारंटाइन होते. त्यामुळे पालिकेचे डॉक्टरच या माय-लेकीची विशेष काळजी घेत होते. या महिलेवर कोरोनाचा उपचार केल्यांनतर 14 एप्रिलला तिच्या दोन चाचणी घेण्यात आल्या. दोन्हीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आठ दिवसांनी या माय-लेकीची भेट झाली.
त्यांनतर मंगळवारी या महिलेला नवजात बालिकेसह घरी सोडण्यात आले. यावेळी रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका यांनी देखील टाळ्या वाजवत त्यांना घरी पाठवले. तर सोसायटी आवारात रुग्णवाहितेतून या महिलेचे मुलीसह आगमन होताच सामाजिक कार्यकर्ते आत्माराम सणस व परिसरातील नागसरिकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर रांगोळी देखील काढण्यात आली होती. त्याद्वारे पती पत्नी व त्यांचे नवजात बालक सुरखरूप परतल्याचा आनंदही परिसरातील नागरिकांनी व्यक्त करून दाखविला.
याच परिसरात राहणाऱ्या एका पोलिसालाही कोरोना झाल्याची घटना दोन दिवसापूर्वी समोर आली आहे. परंतु सदर पोलीस कर्मचारी अनेक दिवसांपासून घरी परतलेला नव्हता. त्यानंतरही नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असतानाही कोरोनातून बरी होऊन आलेल्या या महिलेच्या स्वागताला सोसायटी मधील नागरिकांनी उत्साह दाखवून कोरोनावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास व्यक्त केला.