महानगरपालिकेने घेतली खासगी शाळांची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 11:34 PM2020-09-22T23:34:45+5:302020-09-22T23:34:59+5:30
पालकांना सहकार्य करण्याचे आवाहन : सूचनांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लॉकडाऊन कालावधीत शाळांनी फी न भरल्यामुळे आॅनलाइन शिक्षणातून विद्यार्थ्यांना कमी करणे, फी भरण्यासाठी सक्ती करणे, विद्यार्थ्यांचे निकाल न देणे अशा विविध तक्रारी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे येत आहेत. त्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून सोमवारी २१ सप्टेंबर रोजी शहरातील खासगी शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. पालकांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याध्यापकांना करण्यात आले, तसेच सूचनांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा दिला.
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नवी मुंबई क्षेत्रातील सर्व शाळांचे आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. लॉकडाऊन कालावधीत फीबाबतच्या विविध तक्रारी सद्यस्थितीत शिक्षण विभागाकडे येत असल्याबाबत महापालिकेचे संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी शाळांतील मुख्याध्यापकांची सभा घेण्यात आली. आॅनलाइन शिक्षणापासुन कोणत्याही विद्यार्थ्यांना वंचित ठेवता येणार नाही. फी भरण्यास असमर्थ असणाऱ्या पालकांना फी भरण्यास सक्ती करू नये, अथवा फी भरण्याबाबत शाळेने टप्पे करून द्यावेत, असे अतिरिक्त आयुक्तांनी सुचविले आहे.
तसेच प्रत्येक शाळेने आपल्या शाळेत तक्रार पेटी व सुचना पेटी शाळेच्या दर्शनी भागात लावण्यात यावी. प्रत्येक शाळेने कोणती फी आकारण्यात येते त्याबाबतचा फलक दर्शनीभागात लावण्यात यावा. शाळेबाबत वारंवार फी बाबत प्राप्त होणाºया तक्रारीच्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने एक समिती करण्यात यावी व या समिती मार्फत ज्या शाळेची तक्रार प्राप्त होईल त्या शाळेत प्रत्यक्ष जाऊन सदर समिती तक्रारीबाबत चौकशी करेल असे निर्देश काकडे यांनी दिले.
नवी मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने पालकांच्या तक्रारीची दखल घेण्याबाबत विभागात तक्रार पेटी व सूचनापेटी तयार करण्यात आली आहे, तसेच शिक्षण विभागाशी संबंधित तक्रारींसाठी पालक, नागरिक ०२२- २७५७७०६७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकतात.