महानगरपालिका सुरू करणार स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय; नियोजनासाठी केली समिती गठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 12:51 AM2020-12-02T00:51:42+5:302020-12-02T00:52:00+5:30
नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी १०० कोटींपेक्षा जास्त खर्च आरोग्य विभागावर करत आहे.
नवी मुंबई : शहरवासीयांना सर्वोत्तम सुविधा देता याव्यात व आरोग्य यंत्रणा सक्षम करता यावी, यासाठी महानगरपालिकेने स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियोजनासाठी समिती गठीत करण्यात आली असून, त्यामध्ये वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश आहे.
नवी मुंबई महानगरपालिका प्रत्येक वर्षी १०० कोटींपेक्षा जास्त खर्च आरोग्य विभागावर करत आहे. सद्यस्थितीमध्ये मनपाचे वाशीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय, ऐरोली व नेरुळमध्ये दोन रुग्णालये, माता-बाल रुग्णालय व विभागनिहाय नागरी आरोग्य केंद्र आहे. तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्यामुळे मनपा रुग्णालयात सुपरस्पेशालिटी उपचार देता येत नाहीत. पालिकेची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी नियोजनासाठी मुख्यालयात मंगळवारी विशेष बैठक आयोजित केली होती. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ.दयानंद कटके व इतर अधिकारी उपस्थित होते.
मनपाचे वाशी रुग्णालय ३०० बेडचे आहे. वैद्यकीय रुग्णालय सुरू करण्यासाठी नेरुळ व ऐरोली येथील मनपा रुग्णालयाची क्षमता वाढविण्यासाठी नियोजन आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या. नियोजित वैद्यकीय महाविद्यालयात पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी चर्चा झाली. अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या अध्यक्षतेखाली या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठीत करण्यात आली आहे.. यामध्ये डॉ.प्रवीण शिनगारे यांच्याप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाचा अनुभव असणारे तज्ज्ञ असणार आहेत.
महाविद्यालय सुरू करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक इमारत, हॉस्टेल उभारणे व होणारा खर्च यावर चर्चा करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले, तर मनपा रुग्णालयांमध्ये टर्शरी केअर सुविधा उपलब्ध होऊन मनपाच्या रुग्णालयीन सेवांचे अद्ययावतीकरण होईल, शिवाय या महाविद्यालयाच्या प्राध्यापकांमधून तज्ज्ञ डॉक्टर्स मनपास उपलब्ध होतील.