म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी पालिका सुरू करणार तीन ओपीडी, नवी मुंबईत ७ रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 09:52 AM2021-05-12T09:52:49+5:302021-05-12T09:53:48+5:30
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढला आहे. नवी मुंबईमधील तेरणा रुग्णालयात ४ व अपोलोमध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
नवी मुंबई : शहरातील दोन खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिसचे ७ रुग्ण उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरात या रुग्णांची संख्या वाढण्याची
शक्यता गृहीत धरून मनपाने तीन ओपीडी सुरू करण्याचे निश्चित केले आहे. आजार झाल्याचे निष्पन्न झाल्यास वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना आता म्युकरमायकोसिस आजाराचा धोका वाढला आहे. नवी मुंबईमधील तेरणा रुग्णालयात ४ व अपोलोमध्ये ३ रुग्ण आढळून आले आहेत. शहरात या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
आयुक्त अभिजित बांगर यांनी डॉक्टरांची बैठक घेऊन याविषयी चर्चा केली. महानगरपालिकेच्या वाशी, नेरूळ व ऐरोली रुग्णालयात तत्काळ ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. एखाद्या व्यक्तीस हा आजार झाल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्यावर प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत. याविषयी चाचण्याही मनपा करणार आहे. म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसल्यास रुग्णांनी तत्काळ रुग्णालयात दाखल होणे आवश्यक आहे. या आजाराचा संसर्ग वेगाने पसरतो व त्यामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. यामुळे तत्काळ उपचार सुरू करणे आवश्यक आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी व विशेषत: ज्यांना मधुमेह, किडनीचे आजार आहेत व अवयव प्रत्यारोपण केले आहे त्यांना याचा धोका जास्त आहे.
उपचार पूर्ण झाल्यानंतर ते सहा आठवड्यांपर्यंत या आजाराचा धोका आहे. यामुळे महानगरपालिका कॉल सेंटरच्या माध्यमातून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची नियमित विचारपूसही करणार आहे. याशिवाय याविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे.
नवी मुंबईतील दोन खासगी रुग्णालयांत म्युकरमायकोसिसची लक्षणे असलेले काही रुग्ण उपचार घेत आहेत. मनपाने या आजारावर उपचार करण्यासाठी तत्काळ तीन ओपीडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. वाशी रुग्णालयात रुग्णांना ॲडमिट करून उपचार केले जाणार आहेत. याशिवाय व्यापक प्रमाणात जनजागृतीही केली जाणार आहे.
- अभिजीत बांगर, आयुक्त महानगरपालिका
तत्काळ डॉक्टरांशी संपर्क करा
म्युकरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे. कोरोनामुक्त झालेल्यांना याचा धोका आहे. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे तसेच मधुमेह, किडनीचे आजार, अवयव प्रत्यारोपण केलेल्यांनी अधिक दक्ष राहावे. डोळ्यांना सूज येणे, डोळे लाल होणे, दृष्टी कमी होणे, डोळ्यांतून सतत पाणी येणे, दात दुखणे किंवा हालू लागणे अशा प्रकारची लक्षणे दिसू लागल्यास वेळ न दवडता तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.