नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. याविषयी जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेने युनिसेफच्या वतीने ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ मोहीम सुरू केली आहे. बस, रिक्षा, टॅक्सी, खासगी व सरकारी कार्यालयांमध्ये मास्क असल्याशिवाय परवानगी न देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शहर कोरोनामुक्त करण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करणे, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे तसेच वारंवार हात धुणे ही त्रिसूत्री कोरोनाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे. मास्कचे महत्त्व जनमानसात रुजविण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मास्क नाही तर प्रवेश नाही’ मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
आठही विभाग कार्यालय क्षेत्रांमध्ये या मोहिमेचा शुभारंभ एकाच वेळी करण्यात आला. नेरूळ विभागातील शुभारंभप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद कटके यांच्यासह युनिसेफच्या प्रतिनिधी देविका देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते. महानगरपालिकेने या वेळी १ हजार मास्कचे वाटप करून मास्क कसा वापरावा आणि त्याची विल्हेवाट कशी लावावी याविषयी मार्गदर्शन केले.
शहरातील मुख्य रस्ते, मोठे होर्डिंग, वर्दळीच्या ठिकाणी लाकडी होर्डिंग, एन.एम.एम.टी. बस पॅनल, दुकानांच्या ठिकाणी पोस्टर्स तसेच ध्वनिचित्रफीत व ध्वनिक्षेपकाद्वारे याविषयी जनजागृती केली जाणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांत ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाणार आहे. मास्क नसेल तर बस-रिक्षा-टॅक्सी अशा सार्वजनिक वाहतुकीमध्ये, दुकानांमध्ये प्रवेश देऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.