हिरानंदानी रूग्णालयाविरोधात नगरसेवक आक्रमक

By admin | Published: December 2, 2015 12:44 AM2015-12-02T00:44:58+5:302015-12-02T00:44:58+5:30

हिरानंदानी फोर्टीज सुपर स्पेशालिटी रूग्णालयात एका गरीब रूग्णास चार लाख रूपये बिल आकारण्यात आले. शिवसेना नगरसेवकांनी विनंती केल्यानंतर संबंधितांना पाच हजार रूपयांची

Corporator aggressor against Hiranandani hospital | हिरानंदानी रूग्णालयाविरोधात नगरसेवक आक्रमक

हिरानंदानी रूग्णालयाविरोधात नगरसेवक आक्रमक

Next

नवी मुंबई : हिरानंदानी फोर्टीज सुपर स्पेशालिटी रूग्णालयात एका गरीब रूग्णास चार लाख रूपये बिल आकारण्यात आले. शिवसेना नगरसेवकांनी विनंती केल्यानंतर संबंधितांना पाच हजार रूपयांची सूट देण्यात आली. यामुळे संतप्त लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांच्या तोंडावर पैसे फेकून निषेध व्यक्त केला. व्यवस्थापनाच्या मनमानीविरोधात वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.
खोपोलीमध्ये खाजगी शाळेत तात्पुरत्या स्वरूपात शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या प्रियंका सावंत या महिलेला आठ दिवसांपूर्वी या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेची स्थिती चिंताजनक होती. रूग्णालय व्यवस्थापनाने तिचा जीव वाचविला परंतु आठ दिवसांसाठीच्या उपचारासाठी ४ लाख १२ हजार रूपये बिल आकारण्यात आले. एवढे बिल पाहून रूग्णाच्या नातेवाइकांना धक्का बसला. गावातील नागरिकांनी वर्गणी काढून व कर्ज घेवून हे बिल भरण्यात आले. बिलामध्ये काहीच सूट दिली जात नसल्याने नातेवाइकांनी शिवसेना नगरसेवक शिवराम पाटील यांच्याशी संपर्क साधला. पाटील यांनी रूग्णालयातील अधिकारी बिपीन चेवले यांची भेट घेवून बिल कमी करण्याची विनंती केली. दीड तास वाट पाहिल्यानंतर ५ हजार कमी केले.
शहरातील कोणत्याही खाजगी रूग्णालयात रूग्णाची आर्थिक स्थिती बिकट असेल तर १० ते २० टक्के सवलत दिली जाते. परंतु फक्त ५ हजार रूपयांची सूट दिल्यामुळे पाटील यांनी निषेध केला आहे. मंगळवारी रूग्णालयात जावून चेवले यांच्या तोंडावर पाच हजार रूपये फेकले.
नगरसेवकांनी पैसे फेकून दिल्यामुळे रूग्णालय परिसरात खळबळ उडाली. हिरानंदानी रूग्णालयास महापालिकेने अल्प किमतीमध्ये जागा उपलब्ध करून दिली. याठिकाणी नगरसेवकांचाही मान राखला जात नाही. त्यांना चुकीची वागणूक दिली जात असल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. व्यवस्थापनाच्या कामकाजाविषयी पालिकेच्या स्थायीसमितीमध्ये आवाज उठविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नर्सेसच्या निवासस्थानासाठी असणाऱ्या भूखंडाचा अवैधपणे पार्किंगसाठी वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

व्यवस्थापनाने फेटाळले आरोप
१या प्रकाराविषयी हिरानंदानी फोर्टीजमधील अधिकारी बिपीन चेवले यांनी रूग्णालयाची बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, नगरसेवकांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य नाही. संबंधित रूग्णाची स्थिती अत्यंत चिंताजनक होती. डॉक्टरांनी चांगले उपचार करून रूग्णाचा जीव वाचविला. योग्य ते बिल आकारण्यात आले आहे.
२आम्ही मनपा क्षेत्रातील ८०० रूग्णांवर वर्षाला मोफत शस्त्रक्रिया करण्यास सहमती दिली आहे. आतापर्यंत यासाठी १० कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. यामुळे इतर रूग्णांना बिलात सूट दिली जात नाही. उपचारापूर्वी रूग्णास बिलाविषयी कल्पना देण्यात येते. मनपाच्या रूग्णांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोपामध्येही तथ्य नाही.
३पार्किंगच्या भूखंडाचा करार आमच्याकडे आहे. पालिकेनेच ती जागा आम्हाला दिली आहे. पर्यायी जागा उपलब्ध करेपर्यंत ती वापरण्याची अट करारामध्ये आहे. या जागेत आम्ही वृक्षारोपण करून सुशोभीकरण करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रूग्णालय व मनपाने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप अंतर्गत सुरू केलेली ही सर्वोत्तम सेवा असल्याचा गौरवही आम्हाला मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

फोर्टीज रूग्णालयाने रूग्णाला ४ लाख १२ हजारांचे बिल आकारले. विनंती करूनही फक्त ५ हजार रूपये सूट दिली. हा लोकप्रतिनिधी व गरीब रूग्णांचाही अपमान आहे. रूग्णालयाच्या कारभाराविरोधात पालिका सभागृहात आवाज उठविणार व वेळ पडल्यास न्यायालयात धाव घेणार आहे.
- शिवराम पाटील, नगरसेवक शिवसेना

Web Title: Corporator aggressor against Hiranandani hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.