बेशिस्त रिक्षाचालकांविरोधात नगरसेवकाची ‘दंडुके’शाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:54 AM2019-05-14T00:54:26+5:302019-05-14T00:54:44+5:30
वाहतूक पोलिसांकडे तक्रार करूनही रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाला लगाम लागत नसल्याने नगरसेवकानेच दंडुकेशाही वापरल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ऐरोलीत घडला.
नवी मुंबई : वाहतूक पोलिसांकडे तक्रार करूनही रिक्षाचालकांच्या बेशिस्तपणाला लगाम लागत नसल्याने नगरसेवकानेच दंडुकेशाही वापरल्याचा प्रकार सोमवारी सकाळी ऐरोलीत घडला. या प्रकारात नगरसेवकाने बेशिस्तपणे रस्त्यावर उभ्या असलेल्या १० ते १२ रिक्षांच्या काचा फोडून त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी रिक्षाचालकांनी रबाळे पोलिसांकडे तक्रार केली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
ऐरोली रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूस रिक्षांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. रिक्षा परमिट खुले केल्यापासून शहरातील रिक्षांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामुळे भाडे मिळवण्यासाठी त्यांच्यात चढाओढ लागलेली असते. त्याकरिता अनेक ठिकाणी अवैध थांबे तयार करण्यात आले आहेत. शिवाय जागा मिळेल तिथे रस्त्यावरच रिक्षा उभ्या केल्या जातात. असाच प्रकार ऐरोली रेल्वेस्थानकाबाहेरही पाहायला मिळत आहे.
यासंदर्भात नगरसेवक मनोज हळदणकर यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. यानुसार तिथल्या रिक्षांना शिस्त लावावी, अशी मागणी त्यांनी वाहतूक पोलिसांकडे केली होती. विशेष म्हणजे त्याच ठिकाणी असलेल्या एका रिक्षा संघटनेचेही ते उपाध्यक्ष आहेत. परंतु वाहतूक पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने व रिक्षाचालकांना शिस्त लागत नसल्याने सोमवारी सकाळी त्यांनी कायदा हातात घेतला.
सकाळी ८ च्या सुमारास त्यांनी हातात दंडुका घेऊन बेशिस्तपणे उभ्या असणाऱ्या १० ते १२ रिक्षांच्या काचा फोडून त्यांना तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर परिसरात रिक्षाचालकांनी जमून संताप व्यक्त केला. त्यामुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. अखेर रिक्षाचालकांनी घडलेल्या प्रकाराची रबाळे पोलिसांकडे तक्रार करीत कारवाईची मागणी केली आहे.
ऐरोली रेल्वेस्थानकाबाहेर वाहतुकीला तसेच पादचाऱ्यांना अडथळा होईल अशा प्रकारे रिक्षा उभ्या केल्या जातात. यासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. परंतु पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्याने नाईलाजास्तव कायदा हातात घ्यावा लागला.
- मनोज हळदणकर,
नगरसेवक