नगरसचिवांचा वाढदिवस वादग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 03:58 AM2018-04-26T03:58:38+5:302018-04-26T03:58:38+5:30
जेवणासाठी थर्माकॉलच्या प्लेटचा वापर : प्लास्टिकबंदीला मुख्यालयातच हरताळ
वैभव गायकर ।
पनवेल : संपूर्ण प्लास्टिकबंदीचा ठराव मंजूर करणारी पनवेल ही राज्यातील पहिली व एकमेव महापालिका आहे. मनपाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने संपूर्ण प्लास्टिकबंदी जाहीर केली आहे; पण या निर्णयाच्या अंमलबजावणीकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करत आहे. नगरसचिव अनिल जगधणी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्लास्टिकच्या प्लेटमधून जेवण देण्यात आल्याचे उघड झाले आहे.
नगरसचिव जगधणी यांच्या वाढदिवसानिमित्त पालिकेतील कर्मचाऱ्यांना जेवणाच्या पार्टीचे आयोजन कारणात आले होते. चिकन आणि भाकरी, असा जेवणाचा थाट होता. मात्र, याकरिता थर्माकॉलच्या प्लेट्सचा वापर करण्यात आला होता. थर्माकॉलविक्रीला बंदी असताना पालिकेत या थर्माकॉलच्या प्लेट्स आल्याच कशा? हादेखील प्रश्न या वेळी उपस्थित होत आहे. एकीकडे पालिकेच्या मार्फत थर्माकॉल, प्लास्टिक बंदीकरिता जनजागृती केली जाते. विशेष म्हणेज, सार्वजनिक ठिकाणी उघडपणे या वस्तू आढळल्यास पालिका अधिकारी दंडात्मक कारवाई करीत असतात. मात्र, ज्या कार्यालयामधून यासंबंधी कारवाई केली जाते, त्याच ठिकाणी अशाप्रकारे थर्माकॉलचा वापर करणे, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरसचिव अनिल जगधणी यांच्या वाढदिवसानिमित्त या वेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पालिकेचे इतर अधिकारीही उपस्थित होते. त्यांना शुभेच्छा देतानाच्या सर्व अधिकाºयांच्या फोटोमध्ये समोर टेबलावर जेवणाची थर्माकॉलची प्लेट दिसत आहेत. हा फोटो पाहून सर्वांनाच चीड येणे साहजिकच आहे. पालिकेतील कर्मचाºयांनाच प्लास्टिक किंवा थर्माकॉल वापराबाबत जागरूकता नसेल, तर पनवेल महानगरपालिकेतील नागरिकांचे काय? विशेष म्हणजे, पालिका सचिवांच्या कार्यालयात अशाप्रकारे थर्माकॉलचा वापर सुरू असेल तर ही बाब आयुक्तांनीदेखील गांभीर्याने घेतली पाहिजे.
भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, याकरिता पालिकेला खबरदारी घ्यावी लागणार आहे. याकरिता आयुक्त गणेश देशमुख काय कारवाई करतात, याकडेही सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
यापूर्वी महापालिकेच्या एका कार्यक्रमामध्ये सत्कारासाठीचे बुके, हार व इतर साहित्य प्लास्टिकच्या पिशवीमध्ये आणल्याचे उघड झाले होते, यामुळे पनवेल महापालिकेमध्ये प्लास्टिकबंदी फक्त नावापुरतीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या घटनेची माहिती घेतली आहे. ही बाब गंभीर आहे. पालिकेत कोणताही कर्मचारी यापुढे अशाप्रकारे प्लास्टिक व थर्माकॉलच्या वस्तूंचा वापर करणार नाही, याकरिता तत्काल पत्रक काढले जाईल, असा प्रकार पुढे घडल्यास सक्त कारवाई करण्यात येईल. - गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका