नवी मुंबई : अर्थसंकल्प हा पालिकेच्या कारभारातील सर्वात प्रमुख घटक, वर्षभरातील जमा- खर्चाचा ताळमेळ व पुढील वर्षाच्या नियोजनाचा यामध्ये समावेश असतो. यावर सविस्तर चर्चा करता यावी यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली; पण त्यासाठी ११६ पैकी फक्त ६४ नगरसेवकांनी हजेरी लावली व सायंकाळी हा आकडा २७ वर गेला. यामुळे अंदाजपत्रकाविषयी लोकप्रतिनिधींची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे. अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेचा गुरुवारी तिसरा दिवस. दुसऱ्या दिवशी सरोज पाटील, रवींद्र इथापे व ममीत चौगुले यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. तिसऱ्या दिवशी संजू वाडे, किशोर पाटकर, सोमनाथ वास्कर, रामचंद्र घरत, मनीषा भोईर, मंदाकिनी म्हात्रे, प्रकाश मोरे, सुवर्णा पाटील, रामदास पवळे यांनी चर्चेत सहभाग घेतला. ज्येष्ठ नगरसेवकांनी अर्थसंकल्पामध्ये अनेक विकासकामे सुचविली. सकाळी सभा वेळेत सुरू होऊ शकली नाही. दुपारी जेवणासाठी झालेल्या सुटीनंतरही वेळेत कामकाज सुरू झाले नाही. यामुळे तिसऱ्या दिवशीही सर्व नगरसेवकांना मनोगत व्यक्त करता आले नाही. चर्चेदरम्यान शिवसेनेचे अनेक सदस्य अनुपस्थितीत होते. सत्ताधारी पक्षाचेही अनेक सदस्य गैरहजर होते. अर्थसंकल्पाविषयी कोणालाही फारसे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले. चौथ्या दिवशी अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाणार असून शेवटच्या दिवशी कोण चर्चेत सहभागी होणार व अर्थसंकल्पात वाढ सुचविणार की स्थायी समितीप्रमाणे कपात करणार याकडे लक्ष आहे.
अर्थसंकल्पावरील चर्चेत नगरसेवकांची दांडी
By admin | Published: March 24, 2017 1:18 AM