पार्किंग वसुलीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:19 PM2021-02-25T23:19:58+5:302021-02-25T23:20:06+5:30
वैभव गायकर, पनवेल : खारघर रेल्वेस्थानकामधील पार्किंगमध्ये अनेक महिन्यांपासून अनधिकृतरीत्या वाहनचालकांकडून पार्किंगची आकारणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. ...
वैभव गायकर,
पनवेल : खारघर रेल्वेस्थानकामधील पार्किंगमध्ये अनेक महिन्यांपासून अनधिकृतरीत्या वाहनचालकांकडून पार्किंगची आकारणी केली जात असल्याचे उघड झाले आहे. त्या वसुलीतून कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. घोटाळ्यात सिडकोचे अधिकारी सहभागी असण्याची शक्यता नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी व्यक्त केली असून, बाविस्कर यांनीच हा घोटाळा उघडकीस आणला आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नगरसेवक नीलेश बाविस्कर यांना गुरुवारी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी खारघर रेल्वेस्थानकाच्या पार्किंगमध्ये धाव घेतली. त्यांच्या समोरच अनधिकृत पार्किंग शुल्काची वसुली सुरू असल्याचे दिसून आले. बाविस्कर यांनी या वसुलीबाबत विचारणा केली असता त्यांना सिडकोच्या परिवहन विभागातील संतोष महाले या अधिकाऱ्याचे नाव सांगण्यात आले. तत्काळ बाविस्कर यांनी परिवहन विभागाच्या अधिकारी गीता पिल्लई यांना माहिती दिली. त्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केले. याठिकाणी चारचाकीवरून ११ रुपये प्रति चार तास, दुचाकीसाठी ९ रुपये १२ तास अशी आकारणी केली जाते.
पार्किंग शुल्क वसुलीचे टेंडर संपल्यावरही कोणत्या आधारावर पार्किंग शुल्क आकाराले जात आहे. याबाबत सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. एकीकडे कोविड काळात नागरिक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले असताना सिडकोच्या पे अँड पार्कच्या नावाखाली अशाप्रकारे नागरिकांच्या माथी अनधिकृतरीत्या पार्किंग शुल्क मारणे कितपत योग्य असल्याचा प्रश्न नगरसेवक नीलेश बाविस्कर यांनी उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी या पार्किंगमधूनच दुचाकींची चोरी झाली. अशाप्रकारे चोरीच्या घटनांमध्ये तर येथील कर्मचाऱ्यांच्या हात नाही ना ? अशाप्रकारचे प्रश्न उपस्थित होते आहे. सिडकोच्या नावाखाली असे प्रकार सुरू असतील तर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे.