शहर विकासाच्या नावाखाली नवी मुंबईत भ्रष्टाचार, आरिफ नसीम खान यांची टीका
By योगेश पिंगळे | Published: October 14, 2023 05:30 PM2023-10-14T17:30:50+5:302023-10-14T17:31:25+5:30
काँग्रेसच्या सभेत गणेश नाईक लक्ष्य
नवी मुंबई : देशात आणि राज्यात महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी यासारखे प्रमुख प्रश्न निर्माण झाले असून नागरिकांची सहनशीलता संपलेली आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांचे काम एकसारखे असल्याने देश आणि राज्यातील नागरिकांना आता परिवर्तन हवे असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांनी सांगितले. नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित केलेल्या परिवर्तन सभेत ते बोलत होते.
नवी मुंबईच्या नेत्यांनी शहराच्या विकासाखाली भ्रष्टाचार करून स्वतःचा विकास केल्याचा आरोप त्यांनी यावेळी नाव न घेता आमदार गणेश नाईक यांच्यावर केला. नवी मुंबई भ्रष्टाचार मुक्त करण्याबरोबरच भारतीय जनता पार्टीच्या पोकळ आश्वासनांचा, गैरकृत्यांचा जनतेला वीट आला असून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आणि केंद्रात पुन्हा एकदा काँग्रेस सत्तेवर येऊन एक चांगले सरकार देशाला मिळेल, असा आशावादही खान यांनी व्यक्त केला. यावेळी मार्गदर्शन करताना माजी मंत्री विश्वजित कदम यांनी १९९९ पासून २०१४ या काळात राज्याचे मुख्यमंत्री आणि नगरविकास खात्यामुळे नवी मुंबई शहराचा खऱ्या अर्थाने विकास झाल्याचे ते म्हणाले. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या नेत्यांकडे नवी मुंबईकरांचे प्रश्न माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने मांडून ते सोडविल्याचे आपण पाहिले असल्याचे यावेळी कदम म्हणाले.
कार्यक्रमाला अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सदस्य बचुभाई धरमशी आरेठीया, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत, नवी मुंबई काँग्रेस अध्यक्ष अनिल कौशिक, नवी मुंबई महिला जिल्हाध्यक्षा पूनम पाटील, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, मंदाकिनी म्हात्रे, अविनाश लाड, प्रभारी एहसास अहमद खान, नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्यासह माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐरोलीतून अनिकेत म्हात्रे काँग्रेसचे उमेदवार
काहीतरी कर नवी मुंबई कर या अनिकेतच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी युवकची टीम उभी आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांना विधानसभेला काँग्रेसच्या माध्यमातून तिकीट देण्यात येईल. त्यांना पाहिजे ती मदत करणार असल्याचेही ते म्हणाले.
प्रत्येक कामात ५ टक्के घेतले
नवी मुंबईतील एका नेत्याच्या मुलाला महापौर करण्यासाठी आम्ही मदत केली त्यानंतर त्यांनी आम्हाला उपमहापौर करण्यासाठी मदत केली त्यामुळे कोणाचेही कोणावर उपकार नसून आमचा बाप काढणे, या नेत्याला शोभत नसल्याची टीका माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी केली. या नेत्याने आजवर काम न करता फक्त श्रेय आणि प्रत्येक कामात ५ टक्के घेण्याचे काम केल्याचा आरोप म्हात्रे यांनी नाव न घेता आमदार गणेश नाईक यांच्यावर केला.
अशा लोकप्रतिनिधींचा उपयोग काय
नवी मुंबई शहराला समस्यांनी ग्रासले असून नवी मुंबई हे खरोखर सुनियोजित शहर आहे का असा प्रश्न पडल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे यांनी केली. तिच तिच लोकं सत्तेवर असून सामान्य प्रश्न सुटत नसतील तर अशा लोकप्रतिनिधींचा उपयोग काय ? असा टोलादेखील त्यांनी आमदार नाईक यांना लगावला.