पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावतोय; आठवडाभरात दोन अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात
By वैभव गायकर | Published: September 25, 2022 03:53 PM2022-09-25T15:53:38+5:302022-09-25T15:53:47+5:30
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मध्ये मोडणाऱ्या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पदासाठी कोटींची बोली लावली जाते.
पनवेल: पनवेल महानगराची व्याप्ती वाढत चालली आहे.होऊ घातलेल्या आंतराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलचे महत्व वाढले आहे.जिल्ह्यातील सर्वात जास्त महसुल देणारा तालुका,महामार्गाचे वाढते जाळ्यामुळे वाहनांची वाढती वर्दळ,बार संस्कृतीचा वाढता वरचष्मा तसेच सिडको पालिका प्रशासनाचे मोठ मोठे प्रकल्प यामुळे पनवेल मध्ये पोस्टिंग मिळविण्यासाठी मंत्रायलयापर्यंत लॉबींग केली जाते.याचाच परिणाम पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावत चालला असुन आठवडाभरात दोन वेगवगेळ्या प्राधिकरणाचे अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकले आहेत.
पनवेल मध्ये दि.20 रोजी महामार्ग सुरक्षा पथक, पनवेल विभागातील पोलीस निरीक्षक रामचंद्र नारायण वारे यांना एक लाखाची लाच स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे पथकाने वारे यांना रंगेहात पकडले.दुसरी घटना दि.23 रोजी नवीन पनवेल कार्यालयात सिडको अधिक्षक अभियंतासह माजी सहा कार्यकारी अभियंत्याला 15 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नवी मुंबई पथकाने हि कारवाई केली.प्रकाश बालकदास मोहिले(57), संजय हरिभाऊ डेकाटे (58) अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.या दोन्ही घटनांमुळे पनवेलमध्ये भ्रष्टाचार फोफावत चालला आहे हे प्रकर्षाने समोर आले आहे.यापुर्वी देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात महसूल,पोलीस,पालिका,सिडको प्रशासनातील अधिकारी अडकले आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन मध्ये मोडणाऱ्या पोलीस ठाण्यात वरिष्ठ पदासाठी कोटींची बोली लावली जाते. पनवेल मधील बार,हॉटेल्स,ढाबे,रेस्टोरंट आदींसह जमिनी खरेदीचे गैरव्यवहार या प्रकरणात मोठ्या प्रमाणात पोलीस ठाण्यात उलाढाल होत असल्याने सर्वानाच पनवेल हवेहवेसे वाटत आहे.पनवेल तालुका हा रायगड जिल्ह्यात सर्वाधिक महसूल देणारा तालुका आहे.यामुळे महसूल विभागातील कर्मचारी अनेक वर्षापासून पनवेल मध्येच थांबत आहेत याकरिता वरिष्ठ पातळीवर लॉबिंग,अर्थपूर्ण व्यवहार देखील होत आहेत.सिडको महामंडळ तर सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.
नगरविकास विभाग वगळले तर या महामंडळावर कोणाचेच अंकुश नाही.लोकप्रतिनिधी देखील याठिकाणी गुडघे टेकत असल्याने सिडकोच्या विविध विभागात भ्रष्टाचार फोफावत आहे.नवीन पनवेल सिडको कार्यालयातील दोन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात सापडले असल्याने हे याचे उत्तम उदाहरण आहे.पनवेल महानगरपालिकेत वरिष्ठ पदासाठी थेट मंत्रालयातुन लॉबिंग सुरु आहे. पनवेल मधील जवळपास सर्वच विभागाना भ्रष्टचाराने पोखरले आहे.पोलीस,वाहतूक पोलीस, महसूल, सिडको, महामार्ग पोलीस,उत्पादन शुल्क,एमआयडीसी,प्रदूषण महामंडळ आदी प्राधिकरणाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश पहावयास मिळत आहे.
पोलीस स्टेशनच्या प्रमुख पदासाठी घोडेबाजार
पनवेल मध्ये विविध पोलीस ठाण्यासाठी वरिष्ठ पदासाठी एक प्रकारे लिलाव होतो.याकरिता कोटींची बोली लावली जात असल्याची चर्चा आहे.गृह खात्यात वजन वापरून आर्थिक बळाच्या जोरावर पनवेल मध्ये अधिकारी पोस्टवर नियुक्त होत आहेत.