पनवेल : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा सर्वात मोठा घोटाळा असून, या विमानतळाची कामे कोणाला व कोणत्या पद्धतीने दिली गेली आहेत, याची चौकशी करण्याची गरज आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचा गौप्यस्फोट राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला.पनवेल येथे गुरुवारी पार पडलेल्या जनसंघर्ष यात्रेच्या सभेदरम्यान ते बोलत होते. सभेला काँग्रेसचे मातब्बर नेते उपस्थित होते. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या सभेत उपस्थित काँग्रेस नेत्यांनी भाजपा व मोदी सरकार विरोधात आक्र ोश व्यक्त केला.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही भाजपाची खेळी केवळ शिवसेनेला खूश करण्यासाठी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या सभेत केला. लोकांनी सरकारकडून छावण्या आणि चारा मागितला असताना भाजपा सरकारने लावण्या आणि डान्सबार सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. मोदींनी केवळ चहावर राजकारण केले व योगींनी गाईवर राजकारण केल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.दरम्यान, खासदार हुसेन दलवाई , माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार माणिकराव जगताप, कामगार नेते महेंद्र घरत यांनी आपले मनोगत व्यक्त केले, या वेळी ग्रामपंचायत ओवळे येथील सरपंच अॅडव्होकेट रेश्मा मुंगाजी यांनी आपल्या शकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सभेसाठी बी. एम. संदीप, आमदार भाई जगताप, सचिन सावंत, संतोष शेट्टी, दशरथ भगत, आर. सी. घरत, सुदाम पाटील आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
विमानतळाच्या कामात भ्रष्टाचार, विखे-पाटील यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:15 AM