नाट्यगृहाच्या डागडुजीचा खर्च अनाठायी; मंदा म्हात्रे यांचा आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 11:13 PM2018-11-17T23:13:57+5:302018-11-17T23:14:15+5:30
वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाची इमारत निकृष्ट दर्जाची ठरली आहे. प्रत्येक दोन-तीन वर्षांनी डागडुजीसाठी त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.
नवी मुंबई : वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाची इमारत निकृष्ट दर्जाची ठरली आहे. प्रत्येक दोन-तीन वर्षांनी डागडुजीसाठी त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. हा खर्च अनाठायी असून जनतेच्या पैशांचा अपयव्य आहे. त्यामुळे नाट्यगृहाची संपूर्ण इमारत पाडून त्याठिकाणी अत्याधुनिक दर्जाची नवीन इमारत बांधावी, अशी सूचना बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी महापालिकेला केली आहे.
विष्णुदास भावे नाट्यगृहाची इमारत सिडकोने बांधली आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर ही इमारत हस्तांतरित करण्यात आली. सध्या महापालिका क्षेत्रात हे एकमेव नाट्यगृह आहे. असे असले तरी विविध स्तरावर हे नाट्यगृह गैरसोयीचे ठरू लागले आहे. अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. पार्किंगचा प्रश्न आहे. लिफ्टचे नियोजन नसल्याने वयोवृध्द नाट्यरसिकांना जिने चढून जावे लागत आहे. शिवाय नाट्यगृहांची आसन क्षमताही वाढविण्याची गरज आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या नाट्यगृहाचा मेकओव्हर करण्याची गरज असल्याचे मंदा म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे निर्मितीनंतर काही वर्षातच ही इमारत निकृष्ट ठरली आहे. त्यामुळे प्रत्येक दोन- तीन वर्षांनी नाट्यगृहाच्या डागडुजीवर कोट्यवधी रुपये खर्च करावे लागत आहेत. आता पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी तब्बल १३ कोटी रुपयांचा खर्च निर्धारित करण्यात आला आहे. डागडुजीच्या नावाने सुरू असलेली पैशांची ही उधळपट्टी थांबविण्याची गरज असल्याचे त्यांनी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.
विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी विष्णुदास भावे नाट्यगृह उपयुक्त ठरत आहे. मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शहरवासीयांची संपूर्ण मदार भावे नाट्यगृहावर आहे. त्यामुळे महापालिकेने इमारतीच्या डागडुजीवर अधिक पैसा खर्च न करता संपूर्ण इमारतच नव्याने उभारावी. यात प्रदर्शन हॉल, थिएटर, फूडप्लाझा, स्टील्ट पार्किंग आदी सुविधा उपलब्ध कराव्यात. नाट्यगृहाची सध्याची आसन क्षमता वाढवून ती दोन हजार प्रेक्षकापर्यंत करावी, आदी सूचना मंदा म्हात्रे यांनी केल्या आहेत.