शैक्षणिक साहित्य खरेदीच्या प्रस्तावांस पालिकेची मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 01:57 AM2019-12-25T01:57:51+5:302019-12-25T01:57:56+5:30
गणवेशासाठी १९ कोटी : लॉकर्ससह बाक खरेदीस १४ कोटींचा खर्च
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून सुविधा देण्यासाठी विविध साहित्य खरेदीच्या प्रस्तावांना २४ डिसेंबर रोजी झालेल्या तहकूब महासभेत मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये शालेय गणवेशासाठी १९ कोेटी तर विद्यार्थ्यांसाठी लॉकर्स आणि बाक खरेदी करण्यासाठी सुमारे १४ कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत.
नवी मुंबई शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनादेखील दर्जेदार शिक्षण देण्याच्या अनुषंगाने महापालिकेच्या माध्यमातून शहरात शाळांच्या प्रशस्त इमारती उभारण्यात आल्या आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याबरोबर पूरक पोषण आहार यासारख्या सुविधादेखील देण्यात येतात. २०२०-२१, २०२१-२२ या दोन शैक्षणिक वर्षांकरिता महापालिकेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेश पुरविण्याचा प्रस्ताव प्रशासनाने मांडला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून, शालेय गणवेश खरेदीसाठी सुमारे १९ कोटी ४० लाख ९७ हजार रुपये खर्च होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्याच्या अनुषंगाने शासनाने केलेल्या सूचनेनुसार महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी शाळांमध्ये लॉकर्स सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सुमारे १० कोटी ७३ लाख ५८ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. महापालिकेच्या शाळांमध्ये, वर्गखोल्यांमध्ये, तसेच विद्यार्थ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली असून विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकदेखील खरेदी करण्यात येणार असून, यासाठी ३ कोटी ६७ लाख ७४ हजार रु पये खर्च केले जाणार आहेत.
या विषयांवर चर्चा करताना नगरसेवक सुधाकर सोनावणे यांनी विद्यार्थ्यांना जादा तासांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करीत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. नगरसेवक प्रशांत पाटील यांनी शाळांमध्ये संगणक शिक्षकांची कमतरता असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. नगरसेविका मोनिका पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी लॉकर्सची सुविधा उपलब्ध करून देणे हा प्रस्ताव चांगला असून शहरातील खासगी शाळांनीदेखील याची अंमलबजावणी करावी यासाठी नियमावली तयार करण्याची सूचना केली. नगरसेवक नामदेव भगत यांनी मान्यताप्राप्त शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात येत नाही, तर खाऊचे वाटप कोणत्या आधारावर केले जाते, असा सवाल उपस्थित केला. नगरसेवक किशोर पाटकर यांनी शहरातील अनेक शाळांमध्ये टॅबची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याप्रमाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सदर सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.
नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देताना पालिका शाळांमध्ये असलेली शिक्षकांची कमतरता याकडेदेखील प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी केली. नगरसेविका सपना गावडे यांनी महापालिकेच्या काही शाळांमध्ये प्राथमिक सुविधांचीदेखील दुरवस्था झाली असल्याचे सांगत शैक्षणिक वर्षातील सहा महिने संपल्यावर गणवेश देण्यात येतात. या सुविधांमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, अशी मागणी केली.
विद्यार्थ्यांची अभ्यास सहल
च्महापालिकेच्या शाळांमधील नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची अभ्यास सहल खोपोली येथील इमॅजिका थीम पार्कयेथे आयोजित करण्यात आली असून, यासाठी ३६ लाख ७४ हजार रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तवाला मंजुरी मिळाली आहे. तसेच इयत्ता दुसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांची मुंबईतील कीडझेनिया येथील इनडोअर थीम पार्क येथे सहल आयोजित करण्यात आली आहे. यासाठी सुमारे ६९ लाख ६३ हजार रु पये खर्च केले जाणार आहेत. या प्रस्तावालादेखील महासभेची मंजुरी मिळाली आहे.