भाजपमध्ये प्रवेशासाठी नाराज नगरसेवकांची मनधरणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 06:01 AM2019-08-02T06:01:04+5:302019-08-02T06:01:07+5:30
राजकीय घडामोडींना वेग; नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या होणार बैठका
नवी मुंबई : गणेश नाईक यांच्यासोबत नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आणि त्यांच्यासोबतचे ४६ नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असले, तरी जे ११ नगरसेवक भाजप प्रवेशास तयार नाहीत, त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ५२ व अपक्ष पाच नगरसेवक आपल्यासोबत असल्याचा दावा संदीप नाईक यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात तसे चित्र नसल्याने पालिकेत राष्ट्रवादीची सत्ता पूर्णपणे भाजपकडे जाणार नसल्याचे लक्षात आल्याने विद्यमान नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला नव्हता. माजी मंत्री गणेश नाईक यांच्यासोबत ठाणे जिल्ह्यातील विविध नगरसेवकांनीही प्रवेश केला, तर जिल्हा पातळीवर खिंडार पाडल्याचे चित्र उभे रहावे, यासाठी त्यांच्या निकटवर्तीयांची धडपड सुरू आहे. ही जुळवाजुळव पूर्ण झाल्यानंतरच नाईक भाजपमध्ये प्रवेश करतील.
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय नवी मुंबईतील माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक अशोक गावडे यांनी याआधीच राष्ट्रवादी सोडण्यास नकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहण्याची इच्छा असलेल्या नगरसेवकांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. नवी मुंबईतील राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लक्ष असून येत्या दोन दिवसांत त्यांच्या बैठका सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
२५ वर्षांपासून नागरिकांनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे. भाजपमध्ये प्रवेशास नागरिकांचा विरोध आहे. प्रभागातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या असून पक्षांतर न करता राष्ट्रवादी पक्षातच राहावे, अशी भावना असल्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहोत.
- डॉ. जयाजी नाथ, नगरसेवक,
राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षांतर न करण्यासाठी प्रभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेटी घेतल्या आहेत. तशी प्रभागातील जनतेचीही भावना असल्याने सीबीडीमधील नगरसेवक नाथ, साबू डॅनियल असे आम्ही सारे राष्ट्रवादीमध्येच राहणार आहोत.
- अशोक गुरखे, नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस