नेरुळ-उरण लोकलचे काउंटडाउन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 03:56 AM2018-09-18T03:56:17+5:302018-09-18T03:56:44+5:30
सिडको-रेल्वेचा संयुक्त पाहणी दौरा; आॅक्टोबरमध्ये पहिल्या टप्प्याचा शुभारंभ
नवी मुंबई : बहुप्रतीक्षित नेरुळ-उरण लोकल सेवेचे काउंटडाउन सुरू झाले आहे. आॅक्टोबर महिन्यात या मार्गावरील खारकोपरपर्यंतच्या पहिल्या टप्प्यात लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडको व रेल्वेने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सोमवारी या मार्गावरील रेल्वेस्थानकांच्या कामाचा आढावा घेतला. रेल्वेच्या टॉवर व्हॅगनमधून बेलापूर ते खारकोपर स्थानकापर्यंतच्या कामांची पाहणी करण्यात आली.
नेरुळ-उरण हा २७ कि.मी. लांबीचा मार्ग आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात खारकोपरपर्यंत लोकल सेवा सुरू करण्यात येणार आहे. नेरुळ (सीवूड) ते खारकोपर हे अंतर १२ कि.मी.चे आहे. तर खारकोपर ते उरण हे अंतर १५ कि.मी.चे आहे. हा संपूर्ण प्रकल्प सिडको आणि रेल्वे यांच्या संयुक्त सहकार्यातून उभारला जात आहे. त्यासाठी १७८२ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.
पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर महिन्यात प्रत्यक्ष लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने दोन्ही यंत्रणांनी कंबर कसली आहे. त्यानुसार सोमवारी सिडको व रेल्वेच्या संयुक्त पथकाने या प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. याअंतर्गत तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर या स्थानकांतील विद्युत दिवे, पंखे, सीसीटीव्ही यंत्रणा, वॉटर कुलर, तिकीट आॅफिस, प्लॅटफार्म अशा विविध कामांची पाहणी करण्यात आली. सिडकोकडील स्थानकांची कामे पूर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या आखात्यारित कामे करावी लागणार आहेत, त्यानुसार उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी संबंधित विभागाला दिल्या.
या वेळी लोकेश चंद्र यांच्यासह मध्य रेल्वेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी एस. के. तिवारी, मुख्य अभियंता एस. एस. केडिया, तसेच सिडकोचे मुख्य अभियंता एस. के. चौटालिया, अतिरिक्त अभियंता शीला करुणाकरण आदी उपस्थित होते.