विधानपरिषद निवडणुकीची सोमवारी नेरूळमध्ये मतमोजणी
By कमलाकर कांबळे | Published: June 30, 2024 10:09 PM2024-06-30T22:09:15+5:302024-06-30T22:09:59+5:30
नेरूळ येथील आगरी कोळी भवनमध्ये मतमोजणी होणार असल्याने याच ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.
नवी मुंबई : विधानपरिषदेच्या कोकण व मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीची सोमवारी मतमोजणी होणार आहे. नवी मुंबईच्या नेरूळ येथील आगरी कोळी भवनमध्ये सकाळपासून मतमोजीणीला सुरुवात होणार आहे. त्यादृष्टीने संबंधित यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्यादृष्टीने संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दोन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले आहे. शनिवारी झालेल्या प्रशिक्षण शिबिराला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी उपस्थिती दर्शविली.
नेरूळ येथील आगरी कोळी भवनमध्ये मतमोजणी होणार असल्याने याच ठिकाणी हे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. यावेळी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी पी. वेलरासू, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे, रायगडचे किशन जावळे, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, सहा.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त अमोल यादव उपस्थित होते. दरम्यान, कोकण पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे निरंजन डावखरे आणि महाविकास आघाडीचे रमेश कीर यांच्यात चुरस असणार आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ॲड. अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे ज.मो. अभ्यंकर रिंगणात आहेत. या मतदारसंघातून कोण बाजी मारणार हे मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.