मतदानादिवशीच नेरूळमध्ये मतमोजणी
By admin | Published: January 7, 2016 12:58 AM2016-01-07T00:58:40+5:302016-01-07T00:58:40+5:30
नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीसाठी १० जानेवारीला मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणीही केली जाणार आहे
नवी मुंबई : नेरूळ प्रभाग ८८ मधील पोटनिवडणुकीसाठी १० जानेवारीला मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणीही केली जाणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून, नेते व प्रमुख पदाधिकारी प्रभागात ठाण मांडून बसले आहेत.
या पोटनिवडणुकीला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने शिल्पा कांबळे यांना उमेदवारी दिली असून, त्यांच्या प्रचारासाठी स्वत: गणेश नाईक, संजीव नाईक, महापौर सुधाकर सोनावणे यांनी प्रचारसभा घेतल्या आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देण्यात आला आहे. माजी नगरसेवक सुरेश शेट्टी स्वत: प्रत्येक घरी जाऊन नागरिकांना राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचे आवाहन करीत आहेत. काँगे्रसने यावेळी पुन्हा नूतन दिगंबर राऊत यांना उमेदवारी दिली आहे. मागील वेळी थोडक्यात पराभव झाल्यामुळे काँगे्रसने कोणत्याही स्थितीमध्ये विजय मिळवायचा, या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, संतोष शेट्टी व पक्षाचे इतर अनेक पदाधिकारी प्रभागात प्रचारामध्ये सहभागी होत आहेत. राष्ट्रवादी व युतीच्या नेत्यांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरू असताना काँग्रेसने मात्र प्रत्येक घरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे.
भारतीय जनता पक्षाने सरस्वती पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना व भाजपाची युतीच्या नेत्यांनीही सभा घेऊन परिवर्तनाचे आवाहन केले आहे. आमदार मंदा म्हात्रे या स्वत: मतदारांशी संवाद साधत आहेत. सरकारने एक वर्षामध्ये कशाप्रकारे जनहिताची कामे मार्गी लावली. नवी मुंबईतील सोडविलेले प्रलंबित प्रश्न, याविषयी माहीती दिली जात आहे.
प्रचारादरम्यान आता तिन्ही पक्षांनी एकमेकांवर टीका सुरू केली आहे. १० जानेवारीला मतदान होणार आहे. यापूर्वी ११ तारखेला मतमोजणी होणार होती, परंतु निवडणूक विभागाने ६ जानेवारीला अधिसूचना काढून मतदानादिवशीच मतमोजणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सेंट झेव्हियर्स शाळेमध्ये सायंकाळी साडेसहा वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. (प्रतिनिधी)