देशातील समुद्राखालील पहिला बोगदा लवकरच दृष्टिपथात; बीकेसी-शीळफाटा दरम्यान धावणार बुलेट ट्रेन
By नारायण जाधव | Published: June 10, 2023 04:41 PM2023-06-10T16:41:39+5:302023-06-10T16:42:05+5:30
६३९७ कोटींचे हे काम आहे. यामुळे देशातील समुद्राखालील हा पहिला बोगदा २०२८ पर्यंत दृष्टिपथात येणार आहे.
नवी मुंबई : मुंबई-अहमदबाद या ५०८ किमी बुलेट ट्रेनच्या मार्गातील सर्वात आव्हानात्मक काम असलेल्या ठाणे खाडीसह बीकेसी ते शीळफाटा दरम्यानच्या २१ किमीच्या बोगद्यासाठी एप्रिल महिन्यात ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्सने निविदा जिंकल्यानंतर आता नॅशनल हायस्पीड काॅर्पोरेशनने शुक्रवारी याबाबतच्या करारावर सह्या केल्या. ६३९७ कोटींचे हे काम आहे. यामुळे देशातील समुद्राखालील हा पहिला बोगदा २०२८ पर्यंत दृष्टिपथात येणार आहे.
बीकेसी ते शीळफाटा या ३५ किमीच्या मार्गात २१ किमीचा हा बोगदा राहणार असून यातील सात किमीचा बोगदा हा ठाणे खाडीखालून जाणार आहे. समुद्राखालून जाणारा हा देशातील पहिला बोगदा मुंबईच्या विक्रोळी ते नवी मुंबईतील घणसोली दरम्यान राहणार आहे.
पर्यावरण दक्षता घेण्याचे आव्हान -
ठाणे खाडीचा परिसर आधीच पर्यावरणात्मकदृष्ट्या संवेदनशील असा राहिला आहे. प्रदूषणामुळे ठाणे खाडीचे मोठे नुकसान झाल्याचे अहवाल वारंवार प्रसिद्ध झाले आहेत. त्यातच ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित झाली असून गेल्या वर्षीच रामसर क्षेत्राचे प्रमाणपत्रही मिळाले आहे. यामुळे या संवेदनशील क्षेत्रात काम करताना मोठी दक्षता घेऊन सर्व पर्यावरणविषयक नियम पाळून तो खोदण्याचे आव्हानात्मक काम आता निविदाकार ॲफकॉन्स कन्स्ट्रक्शन्सला करावे लागणार आहे.
समुद्राखाली ४० मीटर खोल -
समुद्राखालील देशातील हा पहिला बोगदा १३.१ मीटर व्यासाचा राहणार असून तो जमिनाखाली २५ ते ४० मीटर खोल राहणार आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बहुतांश मार्ग हा उन्नत असाच आहे. यात सर्वात मोठा भूमिगत मार्ग हा २१ किमीचा बाेगदा राहणार आहे.
पारसिक डोंगराखालची खोली ११४ मीटर
खाडीखाली ४० तर पारसिक डाेंगराखाली ११४ मीटर खोली राहणार आहे. या बोगद्याच्या मार्गात सर्वात मोठी वृक्षतोड (१८२८ झाडांची) विक्रोळीत करावी लागणार आहे.
न्यू ऑस्ट्रियन टनेलिंगचा वापर
हा बोगदा खोदण्यासाठी टनेल बोअरिंग आणि न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धत वापरली जाणार आहे. यात १६ किमीच्या कामासाठी तीन टनेल बोअरिंग मशिन तर उर्वरित पाच किमीसाठी न्यू ऑस्ट्रियन टनेल मशिन वारण्यात येणार आहेत. यासाठी बीकेसीत ३६, विक्रोळीत ५६ आणि सावली येथे ३९ मीटर खोलीवर तीन शॉफ्ट टाकण्यात येणार आहेत. यासाठी १३.१ मीटर व्यासाच्या कटर हेडच्या टीबीएम मशिनचा वापर केला जाणार आहे. सध्या मेट्रोच्या बोगद्यांसाठी ५ ते ६ मीटर व्यासाच्या कटर हेडचा वापर केला जातो. यामुळे हा बोगदा किती मोठा असेल, याचा अंदाज येईल.