बदलापूरच्या इंदगाव मठावर हल्ला केल्या प्रकरणी न्यायालयाने दामले यांना ठरवले दोषी
By पंकज पाटील | Published: June 5, 2023 07:23 PM2023-06-05T19:23:22+5:302023-06-05T19:25:08+5:30
साधना मठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मठाचे नियंत्रक नरेश विठ्ठल रत्नाकर यांना पाच लाखाची भरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.
बदलापूर - बदलापूर जवळील इंदगाव येथे रत्नाकार महाराज यांच्या साधना मठावर सात वर्षापूर्वी हल्ला केल्याप्रकरणी बदलापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी नगरसेवक कॅप्टन आशीष दामले (३५) यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरविले आहे. हल्लेखोरांमधील १८ जणांची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. बेकायदा जमाव जमविणे, दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करणे, घुसखोरी, हल्ला करणे अशा गुन्ह्यांखाली कॅ. आशीष आनंद दामले यांना न्यायालयाने दोषी ठरविले. तसेच साधना मठाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल मठाचे नियंत्रक नरेश विठ्ठल रत्नाकर यांना पाच लाखाची भरपाई द्यावी, असे निर्देश न्यायालयाने दिले.
न्यायालयाने दामले यांना दोषी ठरवले असले तरी त्यांना कोणतीही शिक्षा अद्याप सुनावलेली नाही. तर हरीश घाडगे, संतोष कदम, संकल्प लेले, वसंत लंघी, योगेश पाटील, उमेश लोखंडे, केतन शेळके, कौशल वर्मा, युवराज गीध, गणेश सोहनी, दीपक लोहिरे, पांडुरंग राठोड, राम लिहे, प्रज्वल तांबे, कुणाल राऊत, अमृत थोरात, धैर्यशील एजागज, हर्षल जाधव या हल्लेखोरांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. संगीता फड यांनी काम पाहिले. तर दामलेच्या वतीने ॲड. ए. वाय. पत्की यांनी काम पाहिले.
दरम्यान या प्रकरणी दामले यांना विचारले असता न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, दरोडा व अपहरण या सारख्या गंभीर आरोप करून माझे राजकीय नव्हे तर माझे संपूर्ण आयुष्य उध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, तो न्यायालयाने हाणून पाडला, हे न्यायालयाने दिलेल्या निकालातून स्पष्ट होते, या आरोपातून आमची सर्वांची निर्दोष मुक्तता केलेली आहे, न्यायालयाने दिलेल्या निकालाची प्रत वाचल्यानंतर आणि वकिलांशी चर्चा केल्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेऊ असे सांगितले.