वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंनी फेटाळला त्यांच्यावरील आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 03:56 AM2021-02-07T03:56:38+5:302021-02-07T07:46:54+5:30

५ मे राेजी होणार पुढील सुनावणी

Court grants bail to MNS chief Raj Thackeray in 2014 Vashi toll vandalism case amp | वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंनी फेटाळला त्यांच्यावरील आरोप

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंनी फेटाळला त्यांच्यावरील आरोप

Next

- सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : भडकावू भाषण केल्याप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यातील आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेटाळले आहेत. आपण केवळ टोल भरू नका, असे वक्तव्य केले असल्याचे ठाकरे यांनी न्यायाधीशांना सांगितले. हा खटला पुढे सुरू राहणार असून ५ मेला यावर पुढील सुनावणी होणार आहे.

वाशी येथे २०१४ मध्ये झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. यामुळे भडकावू भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीला ठाकरे यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावूनही ते हजर राहिले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने त्यांना ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार शनिवारी दुपारी १२.३० वाजता ते सीबीडी येथील वाशी न्यायालयात न्यायाधीश विकास बडे यांच्यापुढे सुनावणीला हजर राहिले. या वेळी न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना पोलिसांनी लावलेले आरोप मान्य आहेत का? याबाबत विचारणा केली असता त्यांनी ते फेटाळले. भाषणात आपण केवळ टोल भरू नका, असे बोललो असल्याचे ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिले. त्यावरून ठाकरे यांचे वकील राजन शिरोडकर, अक्षय काशीद यांनी त्यांच्या जामिनाचा अर्ज केला होता. त्यावर निर्णय देत न्यायाधीश विकास बडे यांनी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची सुटका केली. या खटल्याची पुढची सुनावणी ५ मे आहे. मात्र त्यासाठी पुन्हा न्यायालयात हजर राहण्याची वेळ ठाकरे यांच्यावर येऊ नये यासाठी वकिलांनी कायमस्वरूपी गैरहजेरीची मागणी केली असता न्यायालयाने ती मंजूर केल्याचे वकिलांनी सांगितले.

जामीनदाराची फिरकी
 राज ठाकरे यांना मनसे पदाधिकारी श्याम कोळी जामीनदार राहिले आहेत. त्यामुळे ठाकरे यांना पुन्हा न्यायालयात हजर करायचे असल्यास ती जबाबदारी त्यांची असल्याची समज न्यायाधीशांनी त्यांना दिली आहे. यामुळे सुनावणी झाल्यानंतर कोळी हे ठाकरेंच्या समोर आले असता, “अच्छा, तू मला कोर्टात हजर करणार का?” असा प्रश्न करत त्याची फिरकी घेतली.

Web Title: Court grants bail to MNS chief Raj Thackeray in 2014 Vashi toll vandalism case amp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.