पदपथावरील गटाराची झाकणे गायब; खांदेश्वरस्थानक परिसरातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 01:07 AM2019-06-05T01:07:14+5:302019-06-05T01:07:28+5:30
कळंबोली सर्कलला वाहतूककोंडी झाल्यावर याच रस्त्याने कामोठे वसाहतीतून थेट पनवेल-सायन महामार्ग गाठता येतो. त्यामुळे खांदेश्वर रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा आहे.
कळंबोली : खांदा वसाहत ते खांदेश्वर रेल्वेस्थानक रस्त्यालगतच्या पदपथावरील झाकणे गायब झाली आहेत. यामुळे पादचारी पडून दुखापती होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. नाल्यावरील झाकणे सिडकोने त्वरित बसवावीत, अशी मागणी पादचाऱ्यांकडून होत आहे.
खांदेश्वर रेल्वेस्थानक मार्गावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. खांदा वसाहत, कळंबोली, नवीन पनवेलमधील नागरिक याच मार्गावरून ये-जा करतात. कळंबोली सर्कलला वाहतूककोंडी झाल्यावर याच रस्त्याने कामोठे वसाहतीतून थेट पनवेल-सायन महामार्ग गाठता येतो. त्यामुळे खांदेश्वर रेल्वेमार्ग अतिशय महत्त्वाचा आहे. दहा मिनिटांच्या अंतरावर खांदेश्वर रेल्वेस्थानक असल्याने पादचाºयांची संख्याही मोठी असते. मात्र, पदपथावरील झाकणे काही दिवसांपासून गायब आहेत. रात्रीच्या वेळी अनेक जण नाल्यात पडल्याने अपघाताचेही प्रकार घडले आहेत. या बाबत सिडकोकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, अद्याप झाकणे बसवण्यात आली नसल्याचे कामोठे येथील रहिवासी चंद्रकांत नवले यांनी सांगितले.
पदपथालगत झुडपे वाढली
पदपथाच्या बाजूने जेएनपीटी रस्त्याचा पूल ते खांदेश्वर रेल्वेस्थानकपर्यंत पावसाळी नाले आहेत. पदपथाच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत.पावसाळ्यापूर्वी ही झाडी-झुडपेही तोडण्यात यावी, अशी मागणी पादचाºयांकडून होत आहे.
सिडको नोडमध्ये पावसाळ्यापूर्वीची कामे सुरू आहेत. खांदेश्वर रेल्वेस्थानक परिसरातील पदपथांवरील गटारांची झाकणे गायब असतील, तर पाहणी करून ती बसवली जातील. - व्ही. एल. कांबळी कार्यकारी अभियंता, सिडको