नवी मुंबई : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने चालू महिन्यात ६३५० अनधिकृत फेरीवाल्यांवर तसेच १०६ मार्जिनल स्पेसवर कारवाई केली आहे. त्याद्वारे एक लाख ९२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या कामकाजात अधिकारी व्यस्त असतानाही कारवाईची मोहीम राबवली जात आहे.शहरात अनधिकृत बांधकामांसह अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तर फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाया करूनही त्यांना पूर्णपणे आळा घालण्यात प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे अतिक्रमणांसह अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाईची मोठी मोहीम पालिकेकडून राबवली जात आहे, त्यानुसार चालू महिन्यात ६३५० अनधिकृत फेरीवाल्यांवर तसेच १०६ मार्जिनस स्पेसवर कारवाई करण्यात आली आहे. संपूर्ण महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या या मोहिमेअंतर्गत वाशी विभागात सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये १९०१ अनधिकृत फेरीवाल्यांसह ५१ मार्जिनल स्पेसचा समावेश आहे. त्यांच्याकडून एक लाख ११ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्या पाठोपाठ तुर्भे विभागात १३७० फेरीवाल्यांवर व १६ मार्जिनल स्पेसवर कारवाई करून १७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्याचप्रमाणे बेलापूरमध्ये ३५०, नेरुळमध्ये ३६३, कोपर खैरणेत ५००, घणसोलीत ४९९, ऐरोलीत ९१५ व दिघा परिसरात ४५२ अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. तर मार्जिनल स्पेसवरील कारवायांमध्ये बेलापूरमध्ये चार, कोपरखैरणेत १४, घणसोलीत सहा व ऐरोलीत १५ कारवायांचा समावेश आहे. मागील महिन्याभरापासून महापालिकेचे अधिकारी लोकसभा निवडणुकीच्या लगबगीत असल्याने अतिक्रमण वाढू लागले होते.सातत्य हवेअधिकारी निवडणुकीच्या कामकाजात व्यस्त असल्याची संधी साधून अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण वाढले होते; परंतु अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाईत सातत्य ठेवून त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, काही ठिकाणी होणाऱ्या कारवाया केवळ दिखाव्यासाठी होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा धडाका सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 1:19 AM