फटाके खरेदीसाठी नागरिकांचा आखडता हात, फटाक्यांच्या किमती १0 टक्क्यांनी वाढल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 03:54 AM2018-11-05T03:54:49+5:302018-11-05T03:55:03+5:30
नवी मुंबई शहरात गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी फटाक्यांची दुकाने कमी प्रमाणात लागली असून, फटाके खरेदी करण्यासाठी या दुकानांना अल्प प्रतिसाद लाभत आहे.
- योगेश पिंगळे
नवी मुंबई : नवी मुंबई शहरात गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी फटाक्यांची दुकाने कमी प्रमाणात लागली असून, फटाके खरेदी करण्यासाठी या दुकानांना अल्प प्रतिसाद लाभत आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी व जीएसटीमुळे फटाक्यांच्या किमतीमध्ये झालेली १0 टक्के दरवाढ यामुळे फटाके खरेदीकडे नागरिकांनी आखडता हात घेतल्याचे दिसून आले आहे. प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यावर नागरिकांनी भर दिला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
दिवाळी म्हणजे पणत्या, आकाशदिवे, रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा, मिठाई आणि फराळाची देवाण-घेवाण, एकमेकांना आनंदाने भेटण्याचे दिवस, भाऊ-बहीण यांच्या भेटीचा सण, फटाक्यांची आतषबाजी, फटाक्यांच्या धूमधडाक्याने परिसर व्यापून जातो. फटाक्यांच्या आवाजाने ध्वनिप्रदूषण तर होतेच, परंतु फटाक्यांच्या धुरामुळे वायुप्रदूषण देखील होते. यामुळे फुप्फुसाचे आणि घशाचे आजार वाढतात. वृद्ध आणि लहान मुलांना ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा त्रास होतो. लहान मुले, नवजात अर्भके, गरोदर स्त्रिया यांच्या आरोग्यावर देखील याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्र ी व वापरास, आॅनलाइन फटाके विक्र ीस बंदी घातली आहे. तसेच प्रदूषण टाळण्यासाठी रात्री ८ ते १0 वाजेपर्यंतच फटाके फोडण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे. या वर्षीपासून फटाक्यांवर १८ टक्के जीएसटी लावण्यात आल्याने फटाक्यांच्या किमतीमध्ये सुमारे १0 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच प्रदूषण टाळण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, नवी मुंबई महापालिका, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आदींनी पुढाकार घेऊन फटाके न वाजवता दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांना आवाहन करून याबाबत शहरात जनजागृती केली आहे. फटाक्यांच्या दरांमध्ये झालेली वाढ, फटाके वाजविण्यासाठी वेळेचे बंधन आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान यामुळे फटाके खरेदीसाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद लाभत आहे. यावर्षी शहरात फटका विक्र ीची दुकाने देखील कमी प्रमाणात सुरू करण्यात आली असून महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरात फक्त ८३ दुकानांना परवानगी देण्यात आली आहे.
पनवेल विभागातही कमी प्रतिसाद
फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि वायुप्रदूषण यामुळे फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची जनजागृती नागरिकांमध्ये चांगल्या प्रकारे झाली आहे. फटाक्यांच्या किमतीवर जीएसटी लागल्याने या वर्षी फटाक्यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. पनवेल विभागातील नागरिकांचा फटाके खरेदी करण्यासाठी गेल्यावर्षीपेक्षा अल्प प्रतिसाद लाभत आहे. फटाके विक्र ी करणाºया दुकानांचे प्रमाणही गतवर्षी कमी झाले आहे. त्यामुळे याचा फटका फटाका विक्रे त्यांना बसत आहे.
फटाक्यांच्या किमतीमध्ये गेल्या वर्षीपेक्षा सुमारे १0 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच फटाके वाजविण्यावर आलेली बंधने याचा फटका व्यवसायाला बसला आहे. दिवाळीच्या सुरुवातीलाच शनिवार आणि रविवारी सुटीचे दिवस आले असताना देखील फटाके खरेदी करणाºया ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे.
- सचिन मुळीक,
फटाका विक्रे ते,
वाशी