नवी मुंबई : मध्य रेल्वेच्या साडेसहा लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा असलेल्या ठाणे स्थानकातील गर्दीच्या विभाजनासाठी कळवा-मुंब्रा स्थानकातील लोकलवरील गर्दीचा भार कमी करून नवी मुंबईतील प्रवाशांना थेट कळवा-दिघा मार्गे ऐरोलीकडे येण्यासाठी प्रस्तावित केलेल्या उन्नत दुपदरी रेल्वे प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादनाला शासनाने पुन्हा गती दिली आहे.
यानुसार मध्य रेल्वेने या मार्गासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी मफतलाल कंपन्याच्या मालकीसह शासनाच्या मालकीच्या ५६९१.२४ चौरस मीटर जमिनीची भू संपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. यात शासनाच्या मालकीची जमीन अवघी ४७९.१३ चौरस आहे. मध्य रेल्वेचे निर्माण विभागाचे मुख्य प्रशासन अधिकारी विवेक कुमार गुप्ता यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर ही भूसंपादन प्रक्रिया सुरू केली आहे. हे भूसंपादन रखडल्याने प्रकल्पाचा खर्च दीडशे कोटीहून अधिक रकमेने वाढला आहे.
पंतप्रधानांनी केले होते भूमिपूजनपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २०१६ मध्य या मार्गाचे भूमिपूजन झाले होते. मात्र, तरीही भूसंपादनाअभावी त्याचे काम रखडले आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने एमयूटीपी-३ मध्ये जाहीर केलेल्या विविध प्रकल्पांत बहुचर्चित कळवा-ऐरोली उन्नत प्रकल्पाचा समावेश आहे. याचे ९५ टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पात आवश्यक ३.६५ पैकी ३.५ हेक्टर जागा एमआरव्हीसीच्या ताब्यात आहे. उर्वरित जागा ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील बंद पडलेल्या मफतलाल कंपनीच्या ताब्यात आहे.
एमएमआरडीएने दिलीत ९२४ घरेयेथील मोठ्या भागावर अतिक्रमण झालेले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये रेल्वेने प्रकल्पबाधितांचे सर्वेक्षण केले. यानुसार एक हजार ८० प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन करण्याच्या सूचना रेल्वेने 'एमएमआरडीए'ला दिल्या. जानेवारी २०२० नंतर मुंबई महानगर प्राधिकरणाने ९२४ प्रकल्पबाधितांसाठी पर्यायी घरे देऊ केलेली आहेत. मात्र त्यांनी पर्यायी जागेत जाण्यास नकार देऊन रोजगाराचीही मागणी केली आहे. यामुळे याचा फटका प्रकल्पाला बसला आहे.
सिडकोनेही दिली १२६१.६५ चौमी जागाकळवा-ऐरोली उन्नत मार्गात सिडकोच्या मालकीची १२६१.६५ जागा जात आहे. ही जागा नुकतीच मुंबई रेल्वे विकास महामंडळास हस्तांतरित केली आहे. आता कालौघात या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या दिघा रेल्वेस्थानकाचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. पंतप्रधानांसह अन्य मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने त्याचे उद्घाटन रखडले आहे.
प्रकल्पाचा फायदा कोणालाहा प्रकल्प पूर्णत्वास आल्यास मध्य रेल्वेच्या मार्गावर कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, बदलापूर अशा कर्जत आणि कसारा मार्गावरील स्थानकातून, ठाणे स्थानकात न जाता, थेट नवी मुंबईतील पनवेल, बेलापूर, नेरुळ आणि वाशी स्थानकात जाता येईल. यामुळे दैनंदिन साडेसहा लाखांहून अधिक प्रवाशांची ये-जा असलेल्या ठाणे स्थानकावरही मोठा भार कमी होण्यास मदत होईल. अशातच आता रेल्वेने कळवा येथील मफतलाल कंपनीसह शासनाच्या मालकीच्या ५६९१.२४ चौरस मीटर जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे.