वाशीमध्ये सुकलेल्या झाडांवर कलाकुसर
By admin | Published: May 15, 2017 12:47 AM2017-05-15T00:47:16+5:302017-05-15T00:47:16+5:30
वाशीमध्ये सुकलेल्या वृक्षांवर कलाकुसर करून शहर सुशोभीकरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. वृक्षांवरील कलाकुसर आकर्षक असली
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : वाशीमध्ये सुकलेल्या वृक्षांवर कलाकुसर करून शहर सुशोभीकरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. वृक्षांवरील कलाकुसर आकर्षक असली, तरी त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून मात्र नाराजी व्यक्त होत आहे. विषप्रयोग करून वृक्ष सुकविले जात असल्याचा आरोप केला जात असून, सुकलेल्या वृक्षांच्या जागेवर नवीन वृक्षलागवड करण्याची मागणी होत आहे.
सिडकोने वाशी नोडचा विकास करताना रोडच्या मध्यभागी वृक्षारोपण केले होते. महापालिकेची स्थापना झाल्यानंतरही काही ठिकाणी नवीन वृक्ष लावण्यात आले. शहरवासीयांना प्राणवायू देणारे हे वृक्ष आता व्यावसायिकांना नकोसे झाले आहेत. यामुळे मॉल, शाळा, हॉटेल व इतर दुकानदारांनी त्यांच्या प्रवेशद्वारासमोरील वृक्ष हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेची परवानगी घेऊन अनेक ठिकणी वृक्ष हटविले आहेत. जिथे परवानगी मिळत नाही तिथे विषप्रयोग करून वृक्ष सुकविले जात आहेत. सानपाडामधील एका शाळेच्या प्रवेशद्वारासमोरील वृक्ष दोन वर्षांपूर्वी अशाचप्रकारे विषप्रयोग करून सुकविण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला. या मार्गावरील सर्व वृक्ष व्यवस्थित असताना फक्त प्रवेशद्वारावरील वृक्षच कसे सुकले? असा प्रश्न दक्ष नागरिकांनी उपस्थित केला होता. वाशी सेक्टर १७, रेल्वे स्टेशनसमोरील शोरूमसमोरही अशीच स्थिती आहे.
वाशीमधील दहावी-बारावी बोर्डाच्या समोरील बसस्टॉपच्या बाजूचे अनेक वृक्ष मागील वर्षभरामध्ये अचानक सुकले आहेत. सुकलेल्या वृक्षांच्या बुंध्यावर आकर्षक कलाकुसर करण्यात आली आहे. काही ठिकाणी स्वच्छ भारत अभियान, एक कदम स्वच्छतेकडे, स्वच्छ नवी मुंबई,असे संदेश कोरण्यात आले आहेत. वृक्षांवरील कोरीव काम सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेकांनी याविषयी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत; परंतु पर्यावरणप्रेमींनी मात्र याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. येथील वृक्ष सुकले की सुकविण्यात आले? याची चौकशी करण्यात यावी. या वृक्षांवर विषप्रयोग झाला आहे का? हे तपासणे गरजेचे आहे. नैसर्गिकरीत्या वृक्ष सुकले असतील तर त्याच्या जागेवर किंवा बाजूला पुन्हा वृक्षलागवड करण्याची मागणी केली.