क्रॅशगार्ड बसविणा-या वाहनांवर कारवाई सुरू, फेबु्रवारीपासून २१० चालकांना दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 03:22 AM2018-03-04T03:22:29+5:302018-03-04T03:22:29+5:30
नियमबाह्यपणे क्रॅशगार्ड बसविणा-या वाहनांविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. फेब्रुवारीपासून तब्बल २१० वाहनधारकांकडून दंडवसुली केली आहे.
नवी मुंबई : नियमबाह्यपणे क्रॅशगार्ड बसविणा-या वाहनांविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. फेब्रुवारीपासून तब्बल २१० वाहनधारकांकडून दंडवसुली केली आहे.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दोन दिवसांपासून तुर्भे उड्डाणपुलाखाली व इतर ठिकाणी क्रॅशगार्ड काढण्याची मोहीम सुरू केली आहे. दोन दिवसात ४० वाहनांवर कारवाई केली असून शनिवारी एकाच दिवशी ३० वाहनांचे क्रॅशगार्ड काढले आहेत. फेब्रुवारी महिन्यात १७० वाहनांवर कारवाई केली आहे. वाहनधारकांकडून प्रत्येकी ४ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. नियमाप्रमाणे चार चाकी वाहनांच्या समोरील बाजू फायबरची बनविण्यात आलेली असते. परंतु वाहनधारक त्या ठिकाणी क्रॅशगार्ड बसवून घेत असतात. अपघात झाल्यानंतर वाहनाचे नुकसान होऊ नये व आतमधील चालकासह प्रवाशांना दुखापत होऊ नये यासाठी क्रॅशगार्ड बसवून घेतले जात आहेत. वास्तविक नियमाप्रमाणे पुढील बाजूला फायबर असणे आवश्यक असते. त्यामुळे अपघात झाल्यास पुढील वाहनाचे कमी नुकसान होते. याशिवाय फायबरमुळे कारमधील एअर बलून फुगण्यास मदत होते. परंतु याविषयी माहिती नसल्याने वाहनचालक क्रॅशगार्ड बसवून घेत आहेत.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारीपासून क्रॅशगार्ड असणाºया वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. शनिवारी तुर्भेमध्ये झालेल्या कारवाईमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी शशिकांत तिरसे, अश्विनी खोत, बजरंग कोरावले यांनी सहभाग घेतला. वाहनधारकांनी स्वत:हून क्रॅशगार्ड काढून टाकावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.
नियमबाह्यपणे क्रॅशगार्ड बसविणाºयांवर कारवाई सुरू केली आहे. फेब्रुवारीपासून जवळपास २१० वाहनधारकांकडून दंड वसूल केला असून कारवाई सुरू राहणार आहे.
- संजय डोळे,
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,
नवी मुंबई