मतदानासाठी सदस्यांत जनजागृती करा सिडकोचे गृहनिर्माण सोसायट्यांना आवाहन
By कमलाकर कांबळे | Published: April 18, 2024 07:15 PM2024-04-18T19:15:48+5:302024-04-18T19:16:40+5:30
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शासकीय पातळीवरून प्रयास सुरू आहे.
नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. त्यादृष्टीने मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून विविधस्तरावर प्रयास केले जात आहेत. शासकीय संस्थांना यात सक्रिय भूमिका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सिडको महामंडळानेसुद्धा मतदार जनजागृतीसाठी कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व नोंदणीकृत गृहनिर्माण सोसायट्यांना आपल्या सदस्यांत मतदानाविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शासकीय पातळीवरून सर्वंकष प्रयास सुरू आहे. सिडकोचे कार्यक्षेत्रातील ठाणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे ७ मे आणि २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने संबंधित शासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. विशेषत: मतदानाविषयी व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात आहे. नवी मुंबईसह पनवेल महापालिका आणि उरण नगरपालिका परिसरात जवळपास पाच हजार नोंदणीकृत गृहनिर्माण संस्था आहेत. त्याचप्रमाणे नोंदणी न झालेल्या गृहनिर्माण सोसायटींची संख्याही तितकीच मोठी आहे. या सर्व गृहनिर्माण सोसायट्यांतील सदस्यांत मतदानाविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. तशा आशयाचे पत्र संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांचे पदाधिकारी आणि कार्यकारी सदस्यांना दिले आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी संस्थेच्या आवारात निवडणुकीविषयक सूचना प्रसिद्ध कराव्यात. तसेच भित्तीपत्रके, समाजमाध्यमांद्वारे जनजागृती करावी, असे आवाहन सिडकोने केले आहे.