वाहतूक नियोजनासाठी शहरातील तलावात तरंगते वाहनतळ निर्माण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 04:38 AM2018-11-15T04:38:57+5:302018-11-15T04:39:10+5:30
संघर्ष समितीची सूचना : महापालिका आयुक्तांना दिले निवेदन
पनवेल : पनवेल शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न जटील बनत चालला आहे. शहराची व्याप्ती पाहता पार्किंगचे नवीन स्रोत निर्माण करण्याची गरज आहे. पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने कृष्णाळे तलावावर तरंगते वाहनतळ उभारण्याची मागणी पनवेल संघर्ष समितीच्या माध्यमातून आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे .
शहरातील भाजी मंडईशेजारील तलावाचे सुशोभीकरण करून त्यावर तीन ते चार मजली तरंगते वाहनतळ उभारावे, असे संघर्ष समितीने सुचविले आहे. या सूचनेचे देशमुख यांनी स्वागत केले आहे.पनवेल शहरातील वाहनांची संख्या पाहता पार्किंगचे नियोजन गरजेचे आहे. बाहेरून येणारी वाहने नेमकी कुठे उभी करायची यावरून नेहमीच वादाची ठिणगी पडत आहे. अगदी वाहतूक खात्याच्या कर्मचाऱ्यांनाही अनेकदा त्यावरून मारहाण झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
पनवेल शहरातील भाजी मंडईजवळील तलावाची दयनीय अवस्था झाली आहे. त्याचे सुशोभीकरण करावे, तसेच तलावात तरंगती बहुउद्देशीय वास्तू निर्माण करावी. त्यात ज्येष्ठांसाठी आसन व्यवस्था, मॉर्निंग वॉक मार्गिका आणि संग्रहालयाची व्यवस्था करावी. याच वास्तूच्या काही भागात चारचाकी आणि दुचाकीसाठी पार्किंग व्यवस्था करावी, अशी सूचना संघर्ष समितीने केली आहे. संघर्ष समितीच्या या शिष्टमंडळात कांतीलाल कडू यांच्या समवेत ज्येष्ठ सदस्य उज्ज्वल पाटील, मंगल भारवाड, सचिन पाटील
आणि रामाश्री चौहान आदींचा समावेश होता.
तरंगते वाहनतळ ही संकल्पना उत्कृष्ट आहे. त्यावर निश्चित मार्ग काढला जाईल. कायद्यातील तरतुदी तपासून पाहून त्यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल.
- गणेश देशमुख, आयुक्त ,पनवेल महापालिका