लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: कर्जाच्या थकबाकीमुळे बँकेने जप्त केलेल्या गाळ्यांचे सील तोडून ते भाड्याने दिल्याप्रकरणी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये लहालक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष संभाजी आढळराव यांच्यासह दोन पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ५८ लाखाच्या कर्जवसुलीवरून जप्तीची हि कारवाई करण्यात आली होती.
द डेक्कन मर्चंट को ऑप बँकेच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेरूळच्या महालक्ष्मी नागरी सेवा सहकारी पतसंस्थेने डेक्कन बँकेकडून ४० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यामुळे ४० लाख रुपयांचे कर्ज व १८ लाख व्याज अशी ५८ लाखाची थकबाकी पतसंस्थेकडे होती. मात्र त्याचा एकही हप्ता न भरल्याने पतसंस्थेचे नेरुळ येथील २४ गाळे बँकेने ताब्यात घेऊन ते सील केले होते. परंतु २०१० मध्ये हि कारवाई केल्यानंतर पुन्हा त्याची पाहणी करण्यात आली नव्हती. याचाच फायदा घेत महालक्ष्मी पतसंस्थेने गाळ्यांचे सील तोडून ते भाड्याने दिले होते. चार महिन्यांपूर्वी हा प्रकार समोर आल्यानंतर बँकेने पतसंस्थेचे अध्यक्ष संभाजी आढळराव यांना न नोटीस बजावली होती. त्यावेळी त्यांनी बँकेला १० लाख रुपयांचा धनादेश दिला असता तो देखील वटला नाही. यामुळे बँकेने नेरुळ पोलिसांकडे जप्तीतली संपत्ती बळकावून भाड्याने दिल्याप्रकरणी तक्रार केली होती. त्याद्वारे पतसंस्थेचे अध्यक्ष संभाजी आढळराव, सचिव कलावती बावळेकर व खजिनदार सबिना ख्वाजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"