नवी मुंबई : शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार मागील सहा महिन्यांत अनधिकृत बांधकाम प्रकरणी जवळपास ४00 जणांवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात रबाले पोलीस ठाण्यात सर्वाधिंक म्हणजेच तब्बल ५३ गुन्ह्यांचा समावेश आहे.महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. तशा आशयाचे निर्देश सर्व विभाग कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आठ विभागात मागील सहा महिन्यात अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या काळात अनेक बांधकामे पाडून टाकण्यात आली आहेत, तर काही बांधकामप्रकरणी संबंधितांवर थेट फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे विविध पोलीस ठाण्यात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपी अॅक्ट कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागील सहा महिन्यात अशा प्रकारे जवळपास ४00 गुन्हे दाखल झाल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण विभागाच्या सूत्राने दिली. रबाले पोलीस ठाण्यात गेल्या सहा महिन्यात ५३ बांधकामधारकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रबाले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोडसे यांनी यास दुजोरा दिला आहे. यात घणसोलीतील ११ अनधिकृत बांधकामे आणि दोन मोबाइल टॉवर्सचा समावेश आहे. वारंवार नोटिसा बजावूनही बांधकाम सुरूच ठेवल्याने महापालिकेच्या तक्रारीवरून हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घणसोली विभाग कार्यालयाअंतर्गत एकाच दिवशी म्हणजेच २७ जून रोजी अनधिकृत बांधकाम करणारे विकासक आणि जमीन मालक अशा एकूण १३ जणांच्या विरोधात एमआरटीपी अॅक्ट कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. घणसोली अतिक्रमण विभागाचे अधिकारी रोहित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. दरम्यान, महापालिकेच्या नोटिसांना भीक न घालता बेकायदा बांधकाम सुरूच ठेवणाºया बांधकामधारकांवर एमआयटीपी अॅक्टनुसार कारवाई करण्यात येईल, असे महापालिकेच्या घणसोली विभागाचे सहाय्यक आयुक्त दत्तात्रेय नागरे यांनी स्पष्ट केले आहे.
अतिक्रमण प्रकरणी सहा महिन्यांत ४00 जणांवर गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 2:00 AM