नवी मुंबई : विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनप्रकरणी आयोजकांसह २० हजार आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशिरा एनआरआय पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.गुरुवारी सीबीडी येथे झालेल्या आंदोलनास नवी मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड परिसरातून हजारोच्या संख्येने आंदोलक उपस्थित होते.
या आंदोलनास पोलिसांनी परवानगी नाकारलेली होती. शिवाय आंदोलन प्रमुखांसह प्रमुख समन्वयकांना प्रतिबंधात्मक नोटीसदेखील बजावल्या होत्या. त्यानंतरदेखील गुरुवारी आंदोलन केल्याप्रकरणी आयोजक, मार्गदर्शक व उपस्थित राहिलेले आंदोलक अशा सुमारे २० हजार व्यक्तींवर एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याशिवाय आंदोलनास उपस्थित राहिलेल्या १८ ते २० हजार आंदोलकांचादेखील त्यात समावेश आहे. त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणे, ड्रोनद्वारे चित्रीकरण करणे, अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांच्यावर गुन्हा दाखल
कृती समिती अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भूषण पाटील, दीपक म्हात्रे, सुरेश पाटील, जे. डी. तांडेल, माजी खासदार जगन्नाथ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, दशरथ भगत, संतोष केणे, रूपेश धुमाळ, प्रकाश शेडगे, माजी खासदार हुसेन दलवाई, आमदार गणपत गायकवाड, माजी आमदार सुभाष भोईर, रमेश पाटील, रामचंद्र घरत, माजी आमदार योगेश पाटील, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, आगरी कोळी युथ फाऊंडेशन अध्यक्ष नीलेश पाटील, स्मिता घरत, महापौर कविता चौतमल, उपमहापौर जगदीश गायकवाड, आमदार राजू पाटील, रवींद्र चव्हाण आदींचा समावेश आहे.