नवी मुंबई : घणसोली, तळवली परिसरातील ३६ वीजचोरांवर महावितरणच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर महिन्यात महावितरणच्या पथकाने परिसरातल्या अवैध वीज जोडण्यांचा शोध घेतला होता. त्यामध्ये यांची वीजचोरी उघड झाली असता दिलेल्या मुदतीतही त्यांनी दंड न भरल्याने गुरुवारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घणसोली गावठाण व लगतच्या परिसरात सातत्याने विजेची समस्या निर्माण होत आहे. उपलब्ध वीज पुरवठ्यावर ताण पडून ट्रान्स्फार्मर जळण्याचा देखील घटना घडत आहेत. यामागे अवैध वीज जोडण्या कारणीभूत असल्याचे दिसून येत होते. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे वाढत असून त्यामधील रहिवास्यांना चोरीची वीज पुरवली जात आहे.
त्यामुळे इतरांच्याही वीज पुरवठ्यावर भार येऊन ट्रान्स्फार्मर जळण्याच्या घटना घडत आहेत. त्याच्या अनुशंघाने महावितरणच्या भरारी पथकामार्फत ऑक्टोबर महिन्यात घणसोली गाव, तळवली व लगतच्या परिसरातल्या वीज जोडण्याची पाहणी करण्यात आली होती. त्यामध्ये ३६ अवैद्य जोडण्या आढळून आल्या होत्या. त्यांनी १ लाख १० हजार २० युनिटची वीजचोरी केली आहे. त्याचे मूल्य २४ लाख १७ हजार रुपये इतके आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात वाशी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार गुरुवारी वाशी पोलिस ठाण्यात संबंधित ३६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये रहिवासी घरांसह काही व्यावसायिक गाळ्यांचा देखील समावेश आहे.