नवी मुंबई : सोडतीमध्ये ठरावीक भूखंड मिळवून देण्यासाठी लाच स्वीकारणा-या सिडकोच्या तत्कालीन सह. नियोजनकाराविरोधात सीबीडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर भूखंड अगोदरच दुसºया व्यक्तीला साडेबारा टक्के योजनेंतर्गत वितरित झालेला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर विकासकाने दिलेले पैसे परत मागितल्याने, ते देण्यास टाळाटाळ केल्याने यासंबंधी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार केली आहे.प्रियदर्शन वाघमारे असे या सिडको अधिकाºयाचे नाव आहे. नियोजन विभागात सह. नियोजनकारपदावर असताना त्याने हा घोटाळा केला होता. त्याने एका विकासकाला रोडपाली सेक्टर २० येथील भूखंड सिडकोच्या सोडतीमध्ये मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. याकरिता प्रतिचौरस मीटरसाठी ५०० रुपये लाचेची मागणी केली होती. चर्चेअंती सात लाख रुपयांवर तडजोड केली होती. त्यानुसार, सप्टेंबर २०१७मध्ये प्रियदर्शनने सदर विकासकाकडून ६ लाख ५० हजार रुपये स्वीकारले होते. मात्र, भूखंडाच्या सोडतीदरम्यान रोडपालीचा तो भूखंड २००८ सालीच साडेबारा टक्के योजनेंतर्गत एका व्यक्तीला वितरित झाल्याचे समोर आले. त्यामुळे विकासकाने भूखंड मिळविण्यासाठी प्रियदर्शनला दिलेले पैसे परत मागितले होते, परंतु त्याने केवळ अडीच लाख रुपयेच परत केले होते, तर उर्वरित चार लाख रुपये देण्यास तो टाळाटाळ करत होता. त्यामुळे विकासकाने झालेल्या फसवणुकीची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे केली होती. शिवाय, भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात आर्थिक व्यवहाराच्या चर्चेचे फोन रेकॉर्डिंगही सादर केले होते. त्यानुसार, तपासाअंती प्रियदर्शन वाघमारे विरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे, लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उपअधीक्षक रमेश चव्हाण यांनी सांगितले. मात्र, याच्याविरोधातल्या वाढत्या तक्रारींमुळे सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी स्वत:च्या बदलीपूर्वी काही दिवस अगोदरच त्याची बदली चिखलदरा येथे केल्याने, त्यास अद्याप अटक केलेली नसल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
लाचखोर सिडको अधिकाऱ्याविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 4:27 AM