डॉक्टर दाम्पत्याविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 02:26 AM2019-12-24T02:26:48+5:302019-12-24T02:27:05+5:30
चिकणघर परिसरात यलप्पा मनगुटकर (४८) हे हॉटेल व्यावसायिक राहतात.
कल्याण : रुग्णालयात नवीन मशीन खरेदी केल्याने कर्ज झाल्याचे सांगत हॉटेल व्यावसायिकाकडून दीड कोटी रुपये घेतले. तसेच त्याबदल्यात गाळे देण्याचे प्रलोभन दाखवले होते; मात्र हे गाळे परस्पर अन्य व्यक्तीला विकले. याप्रकरणी डॉ. हेमंत मोरे आणि त्याची पत्नी डॉ. मनीषा यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.
चिकणघर परिसरात यलप्पा मनगुटकर (४८) हे हॉटेल व्यावसायिक राहतात. तर, डॉ. हेमंत आणि डॉ. मनीषा मोरे यांचे वायलेनगर परिसरात डेंटल हॉस्पिटल आहे. २०१६ मध्ये एका मित्रामार्फत डॉ. मोरे याच्यासोबत मनगुटकर यांची ओळख झाली. नोव्हेंबर २०१६ मध्ये डॉ. मोरे याने मूळगावी जमीन विकत घेतल्याने तसेच रुग्णालयात अत्याधुनिक मशीन खरेदी केल्याने डोक्यावर कर्ज झाल्याचे त्यांना सांगितले. तसेच रुग्णालयाखालील चार गाळे खरेदी करण्यासाठी मनगुटकरांना गळ घातली. त्यांनी पैसे नसल्याचे सांगूनही मोरे यांनी आग्रह केला. अखेर, पैशांची जुळवाजुळव करून मनगुटकर यांनी मोरेला पैसे दिले.
मनगुटकर यांच्याकडून पैशांची जुळवाजुळव होत नसल्याने त्यांनी गोवा येथील हॉटेलची विक्री करून ६५ लाख रुपये जमा केले. त्यानंतर, आपल्या दोन मित्रांच्या समक्ष मनगुटकर यांनी ९० लाख रुपये रोख तसेच आरटीजीएसच्या माध्यमातून ६२ लाख असे एक कोटी ५२ लाख रुपये डॉ. हेमंतला दिले. पैसे मिळाल्यानंतर डॉ. हेमंत याने मनगुटकर यांना प्रॉमिसरी नोट लिहून दिली. पण, पैसे दिल्यानंतर गाळ्यांसंदर्भात विचारपूस केली असता गाळ्यांवर तीन कोटींचे कर्ज असल्याचे सांगण्यात आले.