बोगस ओळखपत्राने फुकट प्रवास करणाऱ्या एसटीतील तोतया कर्मचाऱ्यावर गुन्हा
By नामदेव मोरे | Published: August 30, 2022 06:35 PM2022-08-30T18:35:52+5:302022-08-30T18:36:57+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या पेण कार्यालयात सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून काम करणारे शिवनाथ पाखरे २८ ऑगस्टला पनवेल - पेण मार्गावर खारपाडा टोलनाक्यावर कर्तव्य बजावत होते
नवी मुंबई : एस.टी. बसने फुकट प्रवास करण्यासाठी बनावट ओळखपत्र वापरले जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्याने खारपाडा टोलनाक्यावर तोतया कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या पेण कार्यालयात सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून काम करणारे शिवनाथ पाखरे २८ ऑगस्टला पनवेल - पेण मार्गावर खारपाडा टोलनाक्यावर कर्तव्य बजावत होते. ठाणे अलीबाग एसटी बस क्रमांक एमएच ०७ सी ७४६८ या बसमधील प्रवाशांकडील तिकीट तपासत असताना एक प्रवाशाने तो परिवहन विभागाचा कर्मचारी असल्याचे सांगितले. ओळखपत्र मागीतले असता सचिन जाधव नावाचे ओळखपत्र दाखविले व सातारा आगारात कार्यरत असल्याचे सांगितले. सुरक्षा अधिकाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी आगार प्रमुखाचे नाव विचारले. यामुळे गडबडलेल्या प्रवाशाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव संतोष असल्याचे समजले. त्याचा चुलत भाऊ एस.टी. विभागात काम करत असून फुकट प्रवासाठी त्याच्या नावाचे ओळखपत्र तयार केल्याचे निदर्शनास आले आहे. संतोष विरोधात नवीन पनवेल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.