ऐरोली दुर्घटना प्रकरण : पालिकेसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:45 AM2018-08-14T03:45:35+5:302018-08-14T03:45:49+5:30
अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीच्या इन्सुलेटरचा स्फोट होऊन महिला गंभीर झाल्याप्रकरणी पालिकेसह महापारेषणच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी मुंबई : अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीच्या इन्सुलेटरचा स्फोट होऊन महिला गंभीर झाल्याप्रकरणी पालिकेसह महापारेषणच्या अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर जखमी महिला मृत्यूशी झुंज देत असून, घडलेल्या दुर्घटनेप्रकरणी त्यांच्या नातेवाइकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार रबाळे पोलीसठाण्यात दोन्ही प्रशासनाच्या अधिकाºयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऐरोली सेक्टर ५ येथील अति उच्चदाबाच्या विद्युतवाहिनी खालील जागेत पालिकेने विकसित केलेल्या उद्यानात २ आॅगस्टला हा अपघात घडला होता. उच्चदाबाच्या वायरच्या इन्सुलेटरचा स्फोट होऊन त्याचा एक तुकडा उद्यानातून चाललेल्या मृणाल महाडिक (५२) यांच्या डोक्यात पडला होता. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर मुलुंडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर दुस-याच दिवशी महापारेषणच्या अधिकाºयांनी त्यांना अडीच लाखांची मदत केली. त्याशिवाय अधिक मदतीसाठी देखील महापारेषणचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. मात्र, पालिका अधिकारी व महापारेषण यांच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा जखमी मृणाल महाडिक यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. यानुसार त्यांचा मुलगा राजदत्त यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती; परंतु रबाळे पोलिसांकडे तक्रार करूनही गुन्हे दाखल करण्यास चालढकल होत होती. अखेर परिमंडळ उपआयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर दहा दिवसांनी रबाळे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात महापालिका व महापारेषण अधिकाºयांचा समावेश आहे. उच्चदाबाच्या विद्युतवाहिनीखाली उद्यान उभारू नये, असे लेखी पत्र महापारेषणच्या अधिकाºयांनी पालिका अधिकाºयांना दिलेले आहे, यामुळे ऐरोलीतील दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.