नवी मुंबई : शहरात कोरोनाचा संसर्ग पसरण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दहा विदेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून तिघे जण उपचारांनंतर मुंबईत होम क्वारंटाइन आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लागण झाली आहे.गतमहिन्यात वाशीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. तो मूळचा फिलिपाइन्सचा रहिवासी असून धार्मिक कार्यक्रमासाठी वाशीत आला होता. तिथल्या मशिदीत तो इतर दहा फिलिपाइन्स नागरिकांसोबत राहत होता. त्यापैकी सात जण काही दिवस आधी मुंबईला निघून गेले होते. त्यातील तिघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर काही दिवसांतच मशिदीमधील एका व्यक्तीला लागण झाल्याचे समोर आले. यावेळी त्याच्या कुटुंबीयांचीदेखील चाचणी केली असता, घरातील चौघे जण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच गेला.सध्या वाशीत इतर एका कुटुंबातील सात जण, नेरूळमध्ये तीन, कोपरखैरणेतील एक, ऐरोलीत एक व सीवूड येथे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ऐरोलीचा तरुण वगळता इतरांना त्या फिलिपाइन्स व्यक्तीच्या संपर्कात आल्याने बाधा झाली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात वाशी पोलीस ठाण्यात साथीचे रोग अधिनियम व शहरात बेकायदा वास्तस्व्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी दिली.९७८ जण होम क्वारंटाइननवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २६ झाली आहे. त्यापैकी चौघांवर उपचारांनंतर ते निगेटिव्ह झाले असून, सध्या ते होम क्वारंटाइन आहेत. तर एकूण ९७८ व्यक्ती होम क्वारंटाइन असून २३ जणांना वाशीतील क्वारंटाइन कक्षात ठेवण्यात आले आहे.
फिलिपाइन्सवरून आलेल्या दहा जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 6:20 AM