नवी मुंबई: पोलिसांसोबत ओळख वाढवून त्यांना जमीन खरेदीतून नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या बँक अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मागील काही महिन्यांपासून नेरुळ पोलिसांकडे हे प्रकरण तपासासाठी सोपवण्यात आले होते. तर या प्रकरणात फसले गेल्याने एका हवालदाराने घर सोडल्याचा देखील प्रकार घडला होता.
वाशी परिसरातील एका बँकेच्या अधिकाऱ्याने नियोजनबद्धरीत्या काही पोलिसांना गळाला लावून कोट्यवधी रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. सध्या उरण पोलिस ठाण्यात नियुक्तीवर असलेले सुंदरसिंग ठाकूर त्यांचे सहकारी दौलतराव माने हे तीन वर्षांपूर्वी वाशी वाहतूक शाखेमध्ये कार्यरत होते. यावेळी पामबीच मार्गावर वाहतूक पोलिसांच्या नेहमीच्या बंदोबस्ताच्या ठिकाणीच असलेल्या बँकेतील रमाकांत परीडा याने त्यांच्यासोबत ओळख वाढवली होती. या ओळखीतून परीडा याने माने यांच्या मुलाला बँकेत कामाला लावल्याने सर्वांचा त्याच्यावर विश्वास बसला होता. याचवेळी बँकेने जप्त केलेली घरे स्वस्तात मिळवून देतो, खालापूर येथील जमीन खरेदीत मोठा फायदा आहे असे सांगून त्याने पोलिसांना पैसे गुंतवण्यास सांगितले होते.
यादरम्यान त्याची पत्नी देखील पोलिसांना भेटवून विश्वास देत असे. त्यानुसार राठोड यांनी सुमारे दिड कोटी, माने यांनी सुमारे एक कोटी तर इतर काही हवालदारांनी ५० लाख ते १ कोटींच्या घरात त्याला पैसे दिले आहेत. मात्र पैसे घेतल्यानंतर त्याने संबंधितांना ना कोणती जमीन खरेदी करून दिली, ना कोणते घर दिले. बहुतेकजणांची घरातले दागिने मोडून, घरावर तसेच वैयक्तिक कर्ज काढून त्याला पैसे दिले आहेत. यामुळे कर्जाचा भार वाढू लागल्याने त्यांनी पैसे परत मागण्यास सुरवात केली असता टाळाटाळ होऊ लागली. या मनस्तापात ठाकूर हे घर सोडून निघून गेले होते. अखेर चौकशीअंती नेरुळ पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री रमाकांत परीडा, पत्नी रजनीलक्ष्मी परीडा व त्यांच्या दोन मुली अशा चौघांवर फसवणुकीचा तसेच बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
नोकरीला लावूनही गंडवलेमाने यांच्या मुलाला बँकेत नोकरीला लावल्यानंतर त्याच्या नावाने परीडा याने कर्ज काढून रक्कम स्वतः घेतली. या कर्जाचे हफ्ते फेडण्यात बापलेकांचा पगार जात आहे. शिवाय जमिनीसाठी घर गहाण ठेवून पैसे दिल्याने घरही जाण्याची वेळ आली आहे. ठाकूर यांनीही स्वतःची जमापुंजी, कर्ज काढून पैसे दिल्याने त्यांच्यावरही आर्थिक संकट कोसळले आहे.