कारवाईची भीती दाखवून लाच मागणाऱ्या तिघा पोलिसांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 06:29 AM2018-12-02T06:29:54+5:302018-12-02T06:29:57+5:30
विनापरवाना सॉफ्टवेअर वापरत असल्याने कारवाईची भीती दाखवून लाच मागणाºया तिघा पोलिसांवर शनिवारी कारवाई झाली.
नवी मुंबई : विनापरवाना सॉफ्टवेअर वापरत असल्याने कारवाईची भीती दाखवून लाच मागणाºया तिघा पोलिसांवर शनिवारी कारवाई झाली. तिघेही वाशी पोलीस ठाण्याचे कर्मचारी असून, ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस शिपाई संजय आगोने, पोलीस नाईक संतोष अवघडे व पोलीस शिपाई प्रदीप राठोड अशी तिघांची नावे आहेत.
वाशीतील फिल्म एडिटिंगचा व्यवसाय करणाºया व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. सदर व्यावसायिकाकडून संगणकात वापर होणारे सॉफ्टवेअर बनावट आहे, तसेच व्यवसायाची जागा कर्मशिअल नाही असे सांगून, या तिघांकडून त्यांना कारवाईची भीती दाखवली जात होती. ही कारवाई टाळण्यासाठी त्यांनी सदर व्यावसायिकाकडे तीन लाख रुपयांची मागणी केली होती. चर्चेअंती त्यांनी एक लाख रुपयांवर तडजोड केली होती.
त्यानुसार सप्टेंबर महिन्यात ६० हजार रुपये स्वीकारले होते. तर उर्वरित ४० हजार रुपयांसाठी त्यांच्याकडून पुन्हा व्यावसायिकावर दबाव टाकला जात होता. त्यामुळे व्यावसायिकाने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे या संबंधीची तक्रार केली होती, त्यानुसार उपअधीक्षक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी दुपारी सापळा रचण्यात आला होता. वाशी रेल्वेस्थानकासमोरील मार्गावर कारमध्ये लाचेची रक्कम स्वीकारताच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांच्याविरोधात वाशी पोलीसठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.