अवैध दारू विकणाऱ्या दोन महिलांवर गुन्हे
By admin | Published: April 11, 2017 02:18 AM2017-04-11T02:18:25+5:302017-04-11T02:18:25+5:30
तुर्भे इंदिरानगर परिसरातील अवैध व्यावसायिकांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. शनिवारी दोन ठिकाणी धाड टाकून दोन महिलांना अटक केली असून दारूसाठा जप्त केला आहे.
नवी मुंबई : तुर्भे इंदिरानगर परिसरातील अवैध व्यावसायिकांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. शनिवारी दोन ठिकाणी धाड टाकून दोन महिलांना अटक केली असून दारूसाठा जप्त केला आहे.
तुर्भे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी अवैध व्यवसायाविरोधात विशेष अभियान सुरू केले आहे. पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात अवैध दारु, रॉकेल, अमली पदार्थ व इतर व्यवसाय आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिसरातील नागरिकांची व सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेवून कुठेही अवैध व्यवसाय निदर्शनास आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे. एक आठवड्यापूर्वी वारली पाडा परिसरामध्ये अवैधपणे दारु विक्री करणाऱ्या महिलेला अटक करून दारुसाठा जप्त केला होता. यानंतर ८ एप्रिलला इंदिरानगर व हनुमाननगरमध्ये कारवाई करण्यात आली आहे.
इंदिरानगरमध्ये राहणारी शेवंताबाई दामले ही महिला दारुविक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे बजरंग तांडा मैदानाजवळ धाड टाकून देशी दारुचा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शेवंताबाईविरोधात गुन्हा दाखल के ला आहे. याच दिवशी हनुमाननगरामध्ये धाड टाकून अनिता मेढकर या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. तिच्याकडे देशी दारुच्या १६ बाटल्या सापडल्या आहेत. दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)
पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कुठेही अवैध व्यवसाय निदर्शनास आल्यास तत्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. दारु विक्री व इतर अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू केलेली असून ती नियमितपणे सुरू राहणार आहे. याआधीही शहरातील विविध भागात कारवाई करून २५ हून अधिक आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.- रामचंद्र देशमुख,
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,
तुर्भे