नवी मुंबई :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दसरा मेळाव्यासाठी जात असताना हा प्रकार घडला असून याप्रकरणी रविवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे समर्थक व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक यांच्यातला वाद अधिक टोकाला गेला आहे. त्यातच दसरा मेळाव्याला जाताना ठाकरे समर्थकांनी शिंदेंविरोधात केलेल्या घोषणाबाजी प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेच्या पाच दिवसांनी हा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामध्ये विनायक पवार, प्रकाश ढवळे, नारायण भोसले, अशोक जमादार, शेषनाथ वर्मा, प्रभाकर बुधे व इतर दोघांचा समावेश आहे. हे सर्वजण दसऱ्याच्या दिवशी शिवाजी पार्क येथे मेळाव्याला जात असताना त्यांनी ईश्वरनगर ते ऐरोली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या आधारे रविवारी पोलिसांनी मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल केला आहे.