नवी मुंबई : दिघा परिसरामध्ये अनधिकृत इमारती बांधणाऱ्या व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलिसांनी सहा बिल्डर व दोन एजंटांविरोधात नागरिकांची व शासनाची फसवणूक करणे व खोटे दस्तऐवज बनविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले आहे. ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत व सिडकोच्या जागेवर दिघा परिसरामध्ये ९९ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्या आहेत. या इमारती पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यामधील काही इमारतींना पुढील दोन महिन्यांसाठी दिलासा मिळाला आहे. जवळपास पाच इमारती पाडण्यात आल्या आहेत. इमारती बांधणाऱ्यांवर काय कारवाई केली, अशी विचारणा न्यायालयाने केली होती. पोलिसांना १९ तारखेला याविषयी माहिती सादर करण्यास सांगितले आहे. शिवराम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विजय पवार यांनी शुक्रवारी रबाळे एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. या इमारतीच्या बांधकामांसाठी सर्व परवानगी असल्याचे खोटे सांगून ८ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी याप्रकरणी रमेश खारकर, मुकेश मढवी व नीलेश मोकाशी यांच्याविरोधात फिर्यादी व शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. केरू प्लाझा इमारतीमधील विजयकुमार लाळे व इतर रहिवाशांनीही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. बिल्डरने खोटी कागदपत्रे सादर करून व इमारतीचे बांधकाम अधिकृत असल्याचे सांगून फसवणूक केली असल्याची तक्रारी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनोज खारकर, विवेक पाटील, जगदीश पाटील, दशरथ खडे व जितेंद्र केणी यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शुक्रवारी रात्री सहा बिल्डर व दोन एजंटांवर गुन्हे दाखल केले आहेत. तक्रारदारांना आवाहन दिघा परिसरामध्ये ज्या नागरिकांची बिल्डरने फसवणूक केली आहे, त्यांनी न भीता तक्रार दाखल करावी. प्रत्येक तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
अनधिकृत इमारतींप्रकरणी गुन्हे
By admin | Published: October 17, 2015 11:51 PM