सेना नगरसेवकावर गुन्हा
By Admin | Published: March 26, 2016 02:25 AM2016-03-26T02:25:30+5:302016-03-26T02:25:30+5:30
दिघा येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी शिवसेना नगरसेवक जगदीश गवते यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नव्याने दाखल
नवी मुंबई : दिघा येथील अनधिकृत बांधकाम प्रकरणी शिवसेना नगरसेवक जगदीश गवते यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात नव्याने दाखल झालेल्या दोन गुन्ह्यांमध्ये सात जणांचा समावेश आहे.
दिघा येथील ९९ अनधिकृत इमारतींवर न्यायालयाच्या निर्देशानुसार गतवर्षी एमआयडीसीने कारवाईला सुरवात केली होती. या दरम्यान अनेक रहिवाशांनी न्यायालयात धाव घेतली असता काही इमारतींवर कारवाईला स्थगिती मिळाली होती, तर काही इमारतींमधील रहिवाशांनी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या भावना मांडल्या होत्या. यानुसार शासनाने ही अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंबंधी सकारात्मकता दर्शवली असली तरीही कारवाईचे संकट अद्याप टळलेले नाही. यामुळे फसवणूक झालेल्या रहिवाशांकडून संबंधित अनधिकृत इमारतींच्या विकासकांविरोधात पोलिसांकडे तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुसार सद्य:स्थितीला रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात ५८ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी दोन गुन्हे होळीच्या पूर्वदिवशी दाखल झाले आहेत. रहिवासी अभंग शिंदे व विवेक गौड यांच्या तक्रारीनुसार दाखल झालेल्या या गुन्ह्यांमध्ये एकूण सात जणांचा समावेश असून त्यामध्ये प्रभाग ५ चे शिवसेनेचे नगरसेवक जगदीश गवते हे देखील आहेत. त्यांच्यासह जनाबाई गवते, अरुण गवते, देवराज वावीया, शिरीष पाटील, प्रकाश तुरे व विजय शर्मा यांच्यावरही गुन्हे दाखल झाले आहेत. अनधिकृत जागेत इमारत उभी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे ती जागा स्वत:च्या मालकीची असल्याचे भासवून फसवणूक केल्याची तक्रार शिंदे व गौड यांनी केली असल्याचे उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. याप्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत. (प्रतिनिधी)